नागपूर: महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राजकीय पक्षाकडून सोशल मीडियाचा वापर करण्यात येतो. मात्र, सोशल मीडियाचा वापर करताना उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण पेड सोशल मीडिया आणि बल्क एसएमस हा जाहीर प्रचार मानला जाणार आहे.
तसेच निवडणूक प्रचारसाठी पेड सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नागपूरचे पालिका आयुक्त श्रवण हार्डिकर यांनी दिली आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर नागपूर पालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीनं संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
त्यामुळे निवडणूक प्रचार थांबल्यानंतर सोशल मीडियाचा वापर करुन उमेदवाराच्या प्रचारार्थ बल्स मेसेजेस पाठवल्यास त्या व्यक्तीवर कारवाई होणार आहे.
दरम्यान प्रचारादरम्यान नियमांचं उल्लंघन करून वाहनं चालवणाऱ्यांवर कारवाई कऱण्यात येणार असल्याचं नागपूर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.