सिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे मंगळवारी चिपळूणमधील तिवरे धरण फुटले. झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर 4 जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. एनडीआरएफ आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शोध मोहीम सुरु आहे. धरण फुटल्यामुळे ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यांसह सात गावांमध्ये पाणी घुसलं आहे.


दरम्यान, चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण हेच तिवरे धरणाचे ठेकेदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

व्हिडीओ पाहा



धरण फुटल्यामुळे झालेले मृत्यू सरकारच्या अनास्थेचे बळी आहेत. या सरकारवर कलम 302 अन्वये चा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी त्यांनी केली. तसेच सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. हे आमदार आणि संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

तसेच नैतिक जबाबदारी घेऊन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राजीनामा द्यावा, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान धरणाची डागडुजी व्यवस्थित न झाल्यामुळे धरण फुटल्याचा दावा आमदार सदानंद चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान, खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटलं, असं ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचं मत असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण या घटनेला जबाबदार नसल्याचे सांगत सावंत यांनी चव्हाणांची पाठराखण केली.