Tirumala Tirupati Devasthan : आंध्र प्रदेशातील (Aandhra Pradesh) तिरुमाला तिरुपतीच्या दर्शनाला जात असताना गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) मूर्ती असल्यानं चेकपोस्टवरुन पुढे जाऊ दिले नसल्याचा दावा एका व्यक्तीने केला होता. या व्यक्तीनं एक व्हिडीओ शेअर करत याबाबत दावा केला होता. यानंतर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात होता. मात्र याबाबत आता तिरुमाला तिरुपती संस्थानकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. व्हायरल व्हिडिओमधून करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं संस्थाननं म्हटलं आहे.  


व्हायरल व्हिडीओत नेमकं काय आहे?


एका व्यक्तीनं व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं की, मी तिरुपती बालाजीला आहे. तिरुमालाला मला जायचं होतं. मात्र, तिरुमाला चेकपोस्टवर मला माझ्या गाडीतील शिवाजी महाराजांची मूर्ती पाहून थांबवण्यात आले. मूर्ती काढा नाही तर पुढे जाऊ देणार नाही, असे मला चेकपोस्टवर सांगण्यात आले. शिवाजी महाराजांपेक्षा माझ्यासाठी कोणी मोठं नाही, मी मूर्ती काढू शकणार नाही. म्हणून मी परत चाललो आहे, असं या व्यक्तीनं व्हिडीओत म्हटलं आहे. आपण येथील प्रमुख अधिकाऱ्याला देखील जाऊ देण्याची विनंती केली, मात्र त्यांनीही मला जाऊ दिले नाही. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाने महाराजांची मूर्ती गाडीत लावून यावे, त्याशिवाय या लोकांना कळणार नाही, असंही या व्हिडीओत तो व्यक्ती म्हणतो. 



तिरुमाला तिरुपती संस्थानकडून स्पष्टीकरण


हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. यावर तिरुमाला तिरुपती संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयानं म्हटलं आहे की, भाविकांना त्यांच्या वाहनांमध्ये मूर्ती, छायाचित्रे, राजकीय पक्षाचे ध्वज आणि चिन्हे, मूर्तिपूजक प्रचार साहित्य तिरुमालाला नेण्यास मनाई आहे.


दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वाहन अलिपिरी चेक पॉइंटवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवून त्याची तपासणी केली होती. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काळ्या रंगातील पुतळा ओळखला. ती मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा असल्याचे कर्मचाऱ्याने ओळखले आणि त्यांना तिरुमला येथे जाऊ दिले, असं पत्रकात म्हटले आहे.


सदरील व्यक्तीला देवतांची चित्रे वगळता व्यक्तींचे मूर्ती, राजकीय पक्षांचे ध्वज आणि इतर चिन्हे प्रदर्शित करू नयेत, असे सांगण्यात आले. पण या भक्ताने आमच्यावर शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करत एक व्हिडिओ बनवला आणि इतरांना चिथावणी देण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल केला, असं संस्थाननं म्हटलं आहे.