मुंबई :  ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


येत्या तीन दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता


पुढचे तीन दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात कालही काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती.


WHO कडून मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित


कोव्हिड पॅन्डॅमिकनंतर मंकीपॉबद्दल जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जगातील 75 देशांत मंकीपॉक्सचे 16 हजार रुग्ण आढळले आहेत. भारतातही तीन रुग्ण आढळलेत. ही जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. 2007 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून सातवी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे.


 आज भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार


 देशभरातील भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री/ उपमुख्यमंत्र्यांची बैठक आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. देवेंद्र फडणवीस या बैठकीत सामील होण्यासाठी आज दिल्लीला जाणार आहेत. बैठक भाजप मुख्यालयात दुपारी दोन वाजल्यापासून होणार आहे. मोदी 5 वाजता बैठकीत सामील होतील.


 आज राष्ट्रपती कोविंद यांचं राष्ट्राला संबोधन


 मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल आज संपणार आहे. आज संध्याकाळी सात वाजता ते देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये केंद्रीय मंत्रीमंडळासाठी विशेष भोजनाचं आयोजन करण्यात आलंय. तसेच, राष्ट्रपती भवनाची सफर घडवणाऱ्या ३ पुस्तकांचं प्रकाशनही होणार आहे.


आरे वाचवा मोहिमेसाठी  देशभर आंदोलनं 


आरेतच मेट्रो कारशेड होणार असं राज्य सरकारकडून स्पष्ट केल्यानंतर आणि कामावरील स्थगिती उठवल्यानंतर पर्यावरणवादी आक्रमक झाले आहेत. आरे वाचवा मोहिमेसाठी आज संपूर्ण देशात आंदोलनं पार पडतील. मुंबई, नागपूर, वाराणसी, हैदराबादसारख्या प्रमुख शहरात आंदोलनं होणार आहेत. अशात मुंबईतील आरे परिसरातही आंदोलन होईल. यावेळी पर्यावरणवादी आक्रमक पवित्रा घेऊ शकतात. 


 नीरज चोप्राची आज जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील अंतिम लढत


ऑलिंपिक सुवर्णपदक विजोता नीरज चोप्राची आज जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरी होणार आहे. अमेरिकेत सुरु असलेली ही स्पर्धा भारतीय वेळेनुसार सकाळी 7.05 वाजता सुरु होईल. 


भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरी ODI


भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना (2nd ODI) आज अर्थात रविवारी (24 जुलै) खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली असल्याने आता भारताला मालिका जिंकण्यांची संधी असून वेस्ट इंडीजला मालिकेत बरोबरी मिळवण्याची संघी आहे.