Tiktok Star Santosh Munde Death : आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना हसवणारा टिकटॉक स्टार संतोष मुंडे (Tiktok Star Santosh Munde) याच निधन झालं आहे. विजेचा धक्का (Electric shock) लागून संतोषचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोषसोबतच बाबुराव मुंडे (Baburao Munde) यांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (13 डिसेंबर 2022) रात्री घडली.


अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्यानं दोघांचाही जागीच मृत्यू


संतोष मुंडे आणि बाबुरा मुंडे हे दोघे डीपीचा फ्यूज बदलण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. संतोष मुंडे हा फेमस टिकटॉक स्टार होता. त्याच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील भोगलवाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे. अगदी कमी काळामध्येच संतोषने टिकटॉकच्या माध्यमातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.


सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त


संतोष मुंडे या त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जात होता. त्याचे लाखोंच्या वर फॉलोवर्स आहेत. अस्सल ग्रामीण शैलीमध्ये तो मनोरंजन करत होता. शेतामध्ये बसून तो कायमच टिकटॉकवर व्हिडीओ तयार करायचा. आपल्या अभिनयानं त्यांनी लाखो प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. मात्र, त्याचा दुर्दैवी अंत झाल्यानं सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


मृतांच्या कुटुंबियांना महावितरणने तत्काळ मदत द्यावी, धनंजय मुंडेंची मागणी


शेतकऱ्यांच्या पोरांना ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव आणि अपुऱ्या सुविधा यामुळं सतत बरीच अशी कामे पर्याय नसल्याने आपला जीव धोक्यात घालून स्वतः करावी लागतात. या दुर्दैवी अपघाताची जबाबदारी महावितरणने घ्यावी. या अपघातात नेमकी कुणाची चूक, हे समोर आले पाहिजे असे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. संतोष आणि अपघाती मृत्यू झालेल्या अन्य तरुणाच्या कुटुंबास महावितरणने तत्काळ आर्थिक मदत द्यावी अश मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे. विजेच्या ट्रान्सफॉर्मर वरील फ्यूज जोडताना अचानक वीज प्रवाह सुरू होऊन अपघात घडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबातील संतोषने ग्रामीण भाषा, सहज विनोद आणि देहबोलीचा कलात्मक वापर करून प्रसिद्धी मिळवली होती. या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांनाही धनंजय मुंडेंनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


महत्त्वाच्या बातम्या:


TikTok Star: कारखान्यात काम करणारा 21 वर्षांचा मुलगा युरोपचा सर्वात मोठा टिकटॉक स्टार कसा झाला? 10 कोटींहून अधिक फॉलोअर्स