मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज दिल्लीमध्ये असणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई हे देखील आज दिल्लीत असणार आहेत. ते देखील अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घेऊ, 


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी (Maharashtra Karnataka Border Dispute) आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत असतील. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील अमित शाह यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.या बैठकीआधी बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीकडून बोम्मई यांना पत्र लिहण्यात आलं आहे. कोणत्याही परिस्थितीत बेळगाव आणि इतर परिसर महाराष्ट्राला देण्याबाबत तडजोड करु नये अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे.


महामोर्चासाठी महाविकास आघाडीची बैठक


17 डिसेंबरला होणाऱ्या मोर्चा संदर्भात आज अजित पवारांच्या दालनात मविआच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदानपर्यंत असा हा मोर्चा निघणार आहे. सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत.


पुण्यात आजपासून सवाई गंधर्व महोत्सव सुरू 


आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (Sawai Gandharva Bhimsen Mahotsav) आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकरांना संगीताची मेजवानी अनुभवायचा मिळणार आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुलात हा महोत्सव पार पडणार आहे. दुपारी 4 वाजता सवाईच्या सांगीतिक स्वरयज्ञाला किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाने सुरुवात होणार आहे. त्यानंतर शाश्वती मंडल आणि रतनमोहन शर्मा यांचे गायन होईल. पहिल्या दिवशीची सांगता उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोद वादनाने मैफिल रंगणार आहे. 14 ते  18 डिसेंबर दरम्यान महोत्सव रंगणार असून कार्यक्रम स्थळी सुमारे 7 ते 8 हजार संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या भव्य दिव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आहे.