मुंबई : यंदा गणेशोत्सवासाठी रेल्वेने कोकणात जाण्याचे मनसुबे तुम्ही आखत असाल, तर तुमचा भ्रमनिरास होणार आहे. कारण गणेशोत्सवाच्या काळातल्या रेल्वेचं बुकिंग अवघ्या काही मिनिटांमध्येच फुल्ल झालं आहे.


 

वेटिंग लिस्ट 500 वर

 

5 सप्टेंबरसाठीच्या रेल्वेच्या तिकिटाचं रविवारी सकाळी बुकिंग सुरु झालं आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग हातोहात फुल्ल झालं. काही गाड्यांची वेटिंग लिस्ट ही तब्बल 500 वर जाऊन पोहोचली आहे.

 

3 आणि 4 सप्टेंबरच्या गाड्यांची अवस्थाही काहीशी अशीच आहे. नियमाप्रमाणे 120 दिवस आधी आपण रेल्वेची तिकिटे आरक्षित करु शकतो. त्यामुळे उशिरा जागे झालेल्या प्रवाशांची घोर निराशा होणार आहे.

 

कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस आणि जनशताब्दीसह कोकणात साऱ्याच गाड्या आतापासूनच फुल्ल झाल्या आहेत. फक्त रेल्वेच नाही, तर राज्य परिवहन महामंडळाच्या आणि खासगी बसेसही आतापासूनच हाऊसफुल्ल झाल्या आहेत.

 

दलालांमुळे सामान्य प्रवाशांना त्रास

 

दरम्यान, गणेशोत्सोवाच्या काळात रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय न होण्याकरता जादा गाड्या सोडण्यात येतात. मात्र, नियमित गाड्यांचे आरक्षण सामान्य प्रवाशांना मिळत नाहीत. तिकीट दलालांमुळे सामान्य प्रवाशांना आरक्षण मिळत निसल्याचा आरोप प्रवाशी करत आहेत.