बीड : बीड तालुक्यातील कामखेडा गावात तीन सख्ख्या भावंडांचा नदीच्या बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या आईला गावकऱ्यांनी वाचवलं.

बीडमधील कामखेडामध्ये परवीन शेख आपल्या तीन मुलांसह कपडे धुण्यासाठी गावाजवळील बंधाऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी जिशान या मुलाचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या सानिया आणि अफ्फान या बहिण-भावाचा बुडून मृत्यू झाला. एकमेकांचा जीव वाचवताना तिघांनाही आपल्या जीवाला मुकाव लागलं आहे.

बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी टाकलेल्या परवीन शेख यांना ग्रामस्थांनी वाचवलं आहे. मात्र तिन्ही भावंडांना वाचविण्यात यश आले नाही. या मुलांचे पिता शेतकरी असून त्यांचा कापूस विक्रीचा व्यवसाय असल्याचं देखील कळालं आहे.