संतप्त जमावाकडून मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको, वाहतूक ठप्प
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2016 02:04 PM (IST)
नाशिक : नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचे तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले आहेत. संतप्त नागरिकांनी मुंबई-आग्रा हायवेवरची वाहतूक रोखून धरली आहे. जमावाने मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको केला आहे. ओझरजवळ एका एसटी बसची तोडफोड केल्याचीही माहिती आहे. पोलिसांच्या तीन गाड्याही नागरिकांनी जाळल्या आहेत. मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको, घोटीजवळ वाहतूक ठप्प झाली आहे. घोटी, इगतपुरी बाजारपेठ बंद असून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ताही बंद करण्यात आला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार केला होता. नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर 15 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. मात्र मेडिकल रिपोर्टनुसार बलात्कार झाला नसून, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्टीकरण नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे.