भंडारा : गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 15 जवान शहीद झाले. त्यापैकी तीन जवान हे भंडारा जिल्ह्यातील आहेत. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील 31 वर्षीय भूपेश वालोदे, लाखांदूर तालुक्यातील दयानंद शहारे, साकोली तालुक्यातील नितीन घोरमारे हे तीन जण नक्षली हल्ल्यात शहीद झाले.


शहीद भूपेश वालोदे यांचे नातेवाईक या हल्ल्याबाबत म्हणाले की, "घडलेल्या प्रसंगाला शासन जबाबदार आहे. परंतु आता शासनाने स्वस्थ बसू नये. पुलवामा हल्ल्यानंतर जशी कठोर पावले शासनाने काश्मीरात उचलली होती. त्याची पुनरावृत्ती गडचिरोलीत करावी लागेल."

बुधवारी गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. गडचिरोलीच्या सी-60 पथकातील जवान खासगी वाहनाने जात असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. महाराष्ट्र दिनीच नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत मोठा घातपात घडवल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. गडचिरोलीतील कुरखेड्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ हा भूसुरुंग स्फोट झाला.

नक्षलींना चकवण्यासाठी 15 जवान दोन खासगी गाड्यांनी जात होते. मात्र नक्षलींना याविषयी कुणकुण लागल्यामुळे त्यांनी हा हल्ला घडवल्याची शक्यता आहे. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.