सांगली : सांगलीतल्या हिवरे गावातील तीन महिलांच्या हत्येप्रकरणी निकाल लागला आहे. हिवरे तिहेरी हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय, दोघांना एक लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अॅड. उज्वल निकम यांनी या खटल्याचे काम पाहिले. एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम अशी आरोपींची नावं आहेत. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील हिवरे येथे 21 जून 2015 साली सुधीर घोरपडे यानं मित्राच्या साहाय्यानं शिंदे कुटुंबातील तीन महिलांची हत्या केली होती. सुधीरची बहीण विद्याराणीचं शिंदे कुटुंबात लग्न झालं होतं. सासरचे लोक त्रास देत असल्याच्या रागातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप सुधीर आणि कुटुंबियांनी केला होता. तशी फिर्यादही विटा पोलिसात दिली. पण ते या खटल्यातून निर्दोष सुटले. Ujjwal Nikam | हिवरे तिहेरी हत्याकांडप्रकरणी निकाल, दोन्ही दोषींना आजन्म कारावास | ABP Majha सुधीर घोरपडे हा शिंदे कुटुंबीयावर चिडून होता. आणि बहिणीच्या आत्महत्येचा बदला म्हणून 21 जून 2015 रोजी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम या दोघांनी शिंदे वस्तीवर येवून अंदाज घेत घरातील प्रभावती शिंदे ,निशिगंधा शिंदे आणि सुनीता पाटील यांच्यावर चाकूने गळा कापून व धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या केली होती. पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या या महिला तिहेरी हत्याकांड प्रकरणी सरकारकडून वकील म्हणून विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्त करण्यात आली होती.आज या खटल्याची अंतिम सुनावणी सांगली जिल्हा न्यायालयात पार पडली आहे. या खटल्यात 21 साक्षीदार आणि महत्त्वपूर्ण म्हणजे बारा वर्षाच्या एका मुलाच्या साक्षीवरून आरोपी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम या दोघांना दोषी ठरवत, मरेपर्यंत कारावासाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला आहे.