नवी मुंबई : नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या शिवसेनाप्रवेशाला अचानक लगाम बसला आहे. गुन्हा दाखल असलेल्या गवतेंच्या प्रवेशामुळे चुकीचा संदेश जाईल, या भीतीने प्रवेशाला चाप लावला आहे.

दीपा गवते, नवीन गवते आणि अपर्ण गवते यांचा शिवसेना प्रवेश ऐनवेळी बारगळला आहे. नगरसेवक नवीन गवतेंविरोधात दिघ्यामधे अनधिकृत बांधकामांसंदर्भात गुन्हे दाखल आहेत. त्यावेळी त्यांना अटक होऊन जामिनही मिळाला होता.

ठाणे, मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जर गवतेंना शिवसेनेत प्रवेश दिला तर गुन्हेगारांना शिवसेना पाठिशी घालत आहे, असा संदेश जाण्याची भीती आहे. म्हणून गवतेंचा शिवसेना प्रवेश तूर्तास थांबवण्यात आला आहे.

ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार, नगरसेवक संजय भोईर शिवसेनेत


राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी राष्ट्रवादीला राम राम करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नगरसेवक संजय भोईर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संजय भोईर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक देवराम भोईर आणि उषा भोईरही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

संजय भोईर हे ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यावर अपहरण, खंडणी, मारहाण अशाप्रकारचे चार गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.