मुंबई : आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी राष्ट्रवादीला राम राम करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.


'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात नगरसेवक संजय भोईर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संजय भोईर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक देवराम भोईर आणि उषा भोईरही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

संजय भोईर हे ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते आहेत. अपहरण, खंडणी, मारहाण अशाप्रकारचे चार गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. नगरसेविका उषा भोईर या संजय भोईर यांच्या पत्नी आहेत.

देवराम भोईर हे ठाणे महापालिकेत सगळ्यात ज्येष्ठ नगरसेवक असून, गेल्या 6 टर्मपासून ते ठाणे महापालिकेत नगरसेवक आहेत. चारवेळा राष्ट्रवादीकडून महापालिकेत ते गेले. टीएमटीमधे भंगार घोटाळा प्रकरणी त्यांना हायकोर्टानं दोषी ठरवलं आहे. मात्र, शिक्षा अद्याप जाहीर झालेली नाही.

संजय भोईर यांचं ठाण्यातील घोडबंदर परिसरात मोठं काम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा मोठा फटका बसणारच आहे. त्याचसोबत भाजपलाही फटका बसेल.