नागपूर : नागपूरमध्ये बुधवारी रात्री वेगवेगळ्या भागात गुन्हेगारांनी शहरात कायद्याचे राज्य नसून जंगलराज असल्याचे चित्र निर्माण केलं. अवघ्या चार तासांच्या कालावधीत नागपूरच्या तीन वेगवेगळ्या भागात तिघांची हत्या झाली. त्यामध्ये एक सामन्य भाजी विक्रेता, एक तरुण आणि एका व्यापाऱ्याचा समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही घटनांचा तपास सुरु केला असून काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
पहिली घटना नंदनवन पोलीस स्टेशनअंतर्गत हसनबाग रोडवर घडली. भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे मोहम्मद आसिफ शेख यांच्या ठेल्यावरुन काही गुंडांनी भाजी खरेदी केली, मात्र पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी भाजी विक्रता आसिफ आणि त्याचा मित्र इमरान सय्यद नियाज याने भाजीचे पैसे मागितले. मात्र गुंडांनी पैसे देण्यास नकार देत उलट दोघांना मारहाण केली. त्यानंतर गुडांनी चाकूने भोसकून इम्रानची हत्या केली, तर आसिफ शेखला गंभीर जखमी केले.
दुसरी घटना नंदनवन पोलीस स्टेशनअंतर्गत सेनापती नगरच्या मैदानात घडली. याठिकाणी विकी डहाके नावाच्या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांने भोसकून हत्या केली. या घटनेचं कारण अद्याप समजलं नाही. मात्र पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
तिसरी घटना बैरामजी टाऊन परिसरातील गोंडवाना चौकात घडली. कुलरचा व्यवसाय करणाऱ्या ऋषी खोसला यांची हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून हत्या केली. मध्यरात्रीच्या सुमारास ऋषी खोसला कारने घराकडे जात असताना काही हल्लेखोरांनी कार अडवत ऋषी यांना गाडीबाहेर ओढून काढले. त्यानंतर त्यांची धारधार शस्त्राने हत्या केली.
एकाच रात्री अवघ्या चार तासात घडलेल्या या घटनांमुळे नागपुरात खळबळ माजली आहे. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासन हल्लेखोरांना पकडण्यासाठी कामाला लागलं आहे. मात्र अशा घटनांमुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
VIDEO | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट