पुणे : सध्या पावसाळा सुरू झाला असून अनेक ठिकाणी वीजेचा लपंडाव पाहायला मिळतो. मुसळधार पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कुठे झाडपडी होते, तर कुठे वीजेच्या तारा तुटल्याचं चित्र दिसून येतं. मात्र, वीजेच्या तुटलेल्या तारांमुळे जीव जाण्याचाही धोका असतो. दौंड (Daund) तालुक्यातील दापोडी येथे विजेचा धक्काने (Electricity) एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विजेचा धक्का लागल्याने पती-पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेवेळी घरातून बाहेर गेली असल्याने सुदैवाने चिमुकली बचावली आहे. मात्र, चिमकुलीचे आई-वडिल आणि भावाचा मृत्यू झाल्याने तीचं भवितव्य अंध:कारमय झालं आहे. 


वीजेचा धक्का बसून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत सुनील देविदास भालेकर, पत्नी आदिका भालेकर व त्यांचा लहान मुलगा परशुराम भालेकर या तिघांचा मृत्यू झाला आहे. सुनील यांचे कुटुंब पत्र्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या याच पत्र्याच्या राहत्या घरातील तारेला विद्युत प्रवाह उतरला होता. आज सकाळी सुनील हे अंघोळसाठी जात असताना, कपडे टाकायच्या तारेवर टॉवेल टाकताताना त्यांना विजेचा धक्का बसला. पतीला विजेचा धक्का बसल्याचे पाहून पत्नीने धावाधाव करत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी, आईसमवेत चिमुकला परशुरामही आई-वडिलांच्या मदतीसाठी धावला. मात्र, दुर्दैवाने तिघांचाही करंट लागून मृत्यू झाला. याच कुटुंबात वैष्णवी ही लहान मुलगीही राहत होती. मात्र, ती घराबाहेर गेलेली होती, त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेपासून ती बचावली. दरम्यान, मागील पाच वर्षांपासून हे कुटुंब याठिकाणी उदरनिर्वाह करीत होते. आज वीजेचा करंट काळ बनून आला आणि अख्ख कुटुंबच मृत्यूमुखी पडलं. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर, बचावलेल्या लहान मुलीकडे पाहून संवेदनशील अनेकांचे डोळे पाणावले. 


अजित पवारांकडून शोक, पीडित कुटुंबीयांस मदत 


पुण्याच्या दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेचा धक्का लागून भालेकर कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. भालेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही भालेकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. मी मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पीडित कुटुंबाला तातडीनं पन्नास हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात आलं आहे. प्रत्येकी चार लाख प्रमाणे बारा लाखांची मदत मृतांच्या वारसांना देण्यासाठी तातडीनं प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी ट्विटरवरुन दिली. 


हेही वाचा


ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल