जालना : राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj jarange) पाटील यांनी सरकारला 1 महिन्याचा अवधी देत आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र, दुसरीकडे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं आहे. त्यामध्ये, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा वाढत असून आज ओबीसी नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) व मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी, पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी, उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्याशी संवाद साधला. मी सरकार किंवा विरोधक म्हणून आलेली नाही, तर दिवंगत गोपीनाथ मुंडेंसाहेबांचा वारसा सांभाळण्यासाठी आले आहे, असे म्हणत पंकजा मुंडेंनी उपोषणस्थळावरुन आपली भूमिका मांडली. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. हाके यांनी आज पाणी देखील सोडले आहे, पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे, असे पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटले.
सरकारने आंदोलकांचं म्हणणं ऐकावं ही माझी सर्वात महत्वाची मागणी आहे. या राज्यात, देशात आंदोलन कोणीही करतो, हा त्यांचा अधिकार आहे. इथंसुद्धा मोठ्या मोठ्या नेत्यांनी यायला पाहिजे, यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. मी सरकार आणि आंदोलकांमधील दुवा बनून काम करत आहेत, आंदोलकांचं म्हणणं सरकारकडे मांडत आहे. या भावाने आज पाणी सोडलंय. पण डोळे त्यांचे टवटवीत आहेत, कारण संघर्ष पाचवीला पुजलेला आहे, असे म्हणत पंकजा मुंडेंनी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली.
पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी आहे. आमच्या आंदोलनकर्त्या ओबीसी बांधवांनी ज्या मागणी केल्या आहेत, त्या अनेक मागण्या आहेत. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही हे समजावून सांगा, असे मागणी पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. तसेच, अवैध पद्धतीने ओबीसी प्रमाणपत्र दिले जात असतील तर श्वेतपत्रिका काढून त्याबाबतचा निर्णय घ्या, अशी आंदोलकांची मागणी आहे.
मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही
वंचित समाजाला वैध पद्धतीने दिलेल्या प्रमाणपत्रास आमचा विरोध नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र देण्यात येत असतील, चुकीच्या पद्धतीने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असेल, तर यांचं समाधान, तुमचं समाधान आणि माझं समाधान करणारं उत्तर सरकारने द्यावं, अशी मागणीही पंकजा यांनी उपोषणस्थळावरुन केली आहे. तसेच, या दोन्ही उपोषणकर्त्यांना पाणी देऊन सन्मानाने त्यांचं उपोषण सोडण्यासाठी येथे यावं, असेही त्यांनी म्हटलं.
धनंजय मुंडेंकडे मागणी
सरकार म्हणून धनुभाऊ मी सन्मानाने तुम्हाला विनंती करते, ज्या सन्मानाने या राज्यात उपोषण सोडले जात आहेत. त्याच सन्मानाने या दोघांचं उपोषण सोडलं पाहिजे, असे म्हणत पंकजा यांनी मंत्री धनंजय मुंडेंकडे मागणी केली.