सांगली: सांगलीच्या म्हैसाळमध्ये झालेल्या गर्भपात प्रकरणी आता बेळगावमधून आणखी 3 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

बेळगावातल्या माधवनगरमधील डॉक्टरनं गर्भपातासाठी डॉ. खिद्रापुरेला औषधं पुरवल्याची माहिती आहे. यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं औषधांच्या गोडाऊनवर छापादेखील टाकला आहे.

काही दिवसांपूर्वी गर्भपातादरम्यान स्वाती जमदाडे या महिलेचा मृत्यू झाला होता. याघटनेनं डॉ. खिद्रापुरेचं बिंग फुटलं. पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर जवळच्या ओढ्यात तब्बल 19 अर्भकं पुरल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली.व दरम्यान, डॉ. खिद्रापुरेला 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

सांगलीत गर्भपातादरम्यान स्वाती जमदाडे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान म्हैसाळ गावातील डॉक्टर बाबासो खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात करण्यात येत असल्याचं उघड झालं.

स्वाती जमदाडेचा मृत्यू देखील म्हैसाळमधील याच भारती हॉस्पिटलमध्ये झाला होता. हॉस्पिटलजवळच्या परिसरात पोलिसांनी तपास केला असता त्यांना 19 मृत अर्भकं सापडली.

बाबासो खिद्रापुरे बीएचएमएस असून मूळचा शिरोळ मधील नरवाडचा रहिवासी आहे. मागील 10 वर्षांपासून त्याचं म्हैसाळमध्ये हॉस्पिटल आहे. अनेक वर्षांपासून तो नियमबाह्य पद्धतीनं गर्भपात करत असल्याचा आरोप आहे. या व्यवसायात त्याची पत्नी देखील सहभागी असल्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

स्त्री भ्रूण हत्या करणारा बोगस डॉक्टर खिद्रापुरेला पोलीस कोठडी

सांगलीत स्त्री भ्रूण हत्या करणारा बोगस डॉक्टर खिद्रापुरेला बेड्या


सांगलीत स्त्री भ्रूण हत्या करणारा नराधम डॉ. खिद्रापुरेचा शोध सुरु