पालघर : खरंतर गरोदरपणात महिलांना अवजड कामं न करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र पालघरच्या सुशीला खुरकुटे यांनी गर्भावस्थेत शौचालय बांधण्यासाठी कुदळ हातात घेतली. शौचालयापासून होणारी कुंचबणा दूर करण्यासाठी सुशीलाताईंने दाखवलेल्या धाडसाचं पंतप्रधानांच्या हस्ते कौतुक होणार आहे.


सुशीला खुरकुटे यांचं हे तिसरं बाळंतपण. शौचाला उघड्यावर जायला लागू नये म्हणून त्या खाणंही टाळायच्या. पण त्याचा विपरीत परिणाम बाळावर होत होता. अशावेळी पालघरच्या नांदगावातल्या प्रशासनाने मोफत शौचालय बांधून देण्याची योजना आणली. पण त्यासाठी शोषखड्डा काढणं गरजेचं होतं. अखेर सात महिन्यांच्या या गरोदर बाईने कुदळ हातात घेतली.



अवघ्या 4 दिवसात खड्डा खणला. पुढच्या तीन दिवसात शौचालय उभं राहिलं आणि गेल्या कित्येक वर्षांपासून होणारी कुचंबणा दूर झाली.

शौचाला काट्याकुट्यात जावं लागायचं. लहान मुलं आजारी पडायचे, लाज वाटायची. याचा प्रचंड त्रास व्हायचा. पती रोजंदारीवर गेले होते. मग मीच हातात कुदळ आणि फावडं घेऊन आणि खड्डा खोदणं सुरु केलं, असं सुशीलाताईंनी सांगितलं.

गावातली धडधाकट माणसं सरकारने काम करण्याची वाट पाहत असताना सुशीलाताईंच्या एकाकी लढ्याने आज  सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सुशीला खुरकुटे यांनी देशापुढे आदर्श ठेवला आहे.



सुशीलाताईंच्या धाडसाची दखल थेट केंद्र सरकारने घेतली. जागतिक महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुशीलाताईंचा स्वच्छ शक्ती पुरस्काराने सन्मान होणार आहे.

सुशीला यांनी आत्मसन्मानासाठी केलेलं काम मोठं आहे. पण जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजेसाठी आजही एका गरोदर महिलेला सातव्या महिन्यात हातात कुदळ घ्यावी लागते, हे भूषणावह नक्कीच नाही.