रायगडमध्ये रानभाजी खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 02:32 AM (IST)
रायगड: एरवी पावसाळ्यात विविध प्रकारच्या रानभाज्या खाणं ही आपल्या सगळ्यांसाठी एका प्रकारे पर्वणी असते. पण रायगडमधल्या सुधागड तालुक्यात हीच रानभाजी एकाच कुटुंबातल्या तिघांच्या जिवावर उठली आहे. रासळ गावातील खाडे कुटुंबातील तिघांचा कुलूची भाजी खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुलूची भाजी खाल्ल्यानंतर खाडे कुटुंबातील तिघांना उलट्यांचा त्रास व्हायला लागला, यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान तारामती खाडे यांचा मृत्यू झाला, तर पती आणि मुलगा अनिल यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारांना साथ न दिल्यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकाच घरातील तिघांच्या मृत्यूनंतर गावावर शोककळा पसरली आहे.