उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा साधेपणाने साजरा होणार आहे. नवरात्र महोत्सवात दररोज 60 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे तर नवरात्र काळात तीन दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे. या काळात तुळजापूर येथे संचारबंदीचे आदेश लागू असणार आहेत.
पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातन नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या तीन दिवसात एकही वाहन किंवा भाविक जिल्ह्यात येऊ दिला जाणार नाही.
पौर्णिमेच्या आगोदर एक दिवस, पौर्णिमेच्या दिवशी व पौर्णिमेनंतर एक दिवस असे तीन दिवस तुळजापूरात संचारबंदी असणार आहे. तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.
नवरात्र काळात ज्या भाविकांनी कोरोना लसीचे 2 डोस पूर्ण केले आहेत त्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा 29 सप्टेंबर रोजी होणार असून 7 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या काळात देवीचा नवरात्र उत्सव होणार आहे त्यात 7 ऑक्टोबर घटस्थापना दिवशी पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी व परिसरात कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार असुन सॅनिटायझर,मास्क, सोशल डिस्टन्स हे नियम पाळावे लागतील.
शारदीय नवरात्र महोत्सवास 29 सप्टेंबर रोजी मंचकी निद्राने सुरुवात होणार आहे या काळात देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते.
7 ऑक्टोबर - देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे.
8 ऑक्टोबर - श्री देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना,
9 ऑक्टोबर - रथ अलंकार महापूजा
10 ऑक्टोबर - ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा
11 ऑक्टोबर - शेषशाही अलंकार महापूजा
12 ऑक्टोबर - भवानी तलवार अलंकार महापूजा
13 ऑक्टोबर -महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा
14 ऑक्टोबर - घटोत्थापन
15 ऑक्टोबर - विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे.
त्यांनतर 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल अशी माहिती महंत तुकोजी बुवा यांनी दिली.