शहापूर : तालुक्यातील चांदे गाव परिसरातील तिघांचा मृतदेह एका घनदाट झाडाला मृतावस्थेत लटकल्याचे निदर्शनास आलं होतं. ही आत्महत्या आहे की यांचे खून करून यांना या झाडाला लटकवलं आहे. यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. मात्र, या तिघांपैकी नितीन भेरे नावाच्या एका व्यक्तीचा मंत्र तंत्र आणि काळी विद्येचा अभ्यास होता. त्यामुळे यातूनच मोक्षप्राप्तीसाठी कोणी बळी दिलेला आहे का? असे प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत. पोलीस या तिन्ही दृष्टिकोनातून तपास करत आहेत.



शहापूर तालुक्यातील चांदे गावाच्या माळरानातील झाडांवर दोन दिवसांपूर्वी तीन तरुणांचे मृतदेह लटकत असल्याचे दृश्य इथल्या गुराख्याने पाहिलं. एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी कळताच संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली. या झाडाला याच परिसरातील नितीन भेरे, महेंद्र दुबेले, मुकेश घावट या तिघांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये मिळून आले. 14 तारखेला अमावस्या होती. या रात्री दहा वाजता महेंद्र आणि मुकेश यांना बोलवण्यासाठी सचिन नावाचा एक व्यक्ती त्यांच्या घराच्या दारात आला होता. महेंद्र आणि मुकेश हे मामा भाचे आहेत. रात्री या तिघांमध्ये काहीतरी बोलणं झालं आणि लगेच रात्रीच्या अंधारात हे तिघेही त्या परिसरातून निघून गेले.


संतती प्राप्तीसाठी जादूटोणा, चिमुकलीचं अपहरण करुन बलात्काराचा प्रयत्न, हत्या करुन फुफ्फुसं काढली


या दोघांच्या घरातल्यांनी इथेच कुठेतरी फिरायला गेले असेल म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, त्या दिवसापासून मुकेश, महेंद्र आणि नितीन हे तिघेही बेपत्ता असल्याचं उघड झालं. नितीन बेहरे हा तंत्र मंत्र विद्येचा अभ्यास करत होता. त्याच्या घरामध्ये कालीमातेचे छोटे मंदिर असून तो शिवभक्त आहे. त्याच्या गाभाऱ्यात अनेक तंत्र मंत्र विद्याची पुस्तकं, त्रिशूल चाबुक यासह अनेक गोष्टी आढळून आलेल्या आहेत. नितीन बहिरे हा लोकांचे विविध प्रश्न देवा-धर्माच्या नावाखाली सोडवत असे अशी चर्चा या गावात आहे. मोक्ष प्राप्तीसाठी किंवा पैशांचा पाऊस पाडण्यासाठी किंवा अनेक धार्मिक कारणासाठी या तिघांचा बळी दिलेला आहे का?असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय.


प्रवासात ओळख वाढवून अपहरण केलेल्या चार महिन्यांच्या बाळासह महिलेला अटक


स्थानिक पोलिसांनी या तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन सकृतदर्शनी आत्महत्या असल्याची नोंद केली आहे. मात्र, या तिघांच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून त्यांचे खून करून त्यांना कोणीतरी झाडावर लटकवलं आहे, असा आरोप केलेला आहे. नितीनला काळी जादू आणि तंत्र मंत्र विद्या अवगत होती. त्यामुळे पोलिसांनी या तिघांची आत्महत्या आहे की खून आहे का तंत्र मंत्र विद्येच्या नादाला लागून पैशांचा पाऊस, मोक्षप्राप्ती यासाठी त्यांचा कोणीतरी बळी दिलेला आहे का? या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे. नितीनकडे असलेल्या मोबाईलमध्ये ज्या बाबांचा नंबर आहे त्यांच्याकडे पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. यासंदर्भात पोलिसांची विविध पथकं तालुक्यात, जिल्ह्यात रवाना झाली असून याबद्दल अधिकृत माहिती देण्यासाठी पोलिसांनी नकार दिलेला आहे. संपूर्ण तपास झाल्यानंतरच या प्रकरणा विषयीची माहिती आपण देऊ असेही पोलिसांनी सांगितलेला आहे.