औरंगाबाद : 23 नोव्हेंबरपासून मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शाळा सुरु होणार आहेत. सरकार आणि प्रशासनाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण शाळा सुरु करण्यापूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये अनेक जिल्ह्यातील शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता शिक्षकांनाच कोरोनाची लागण झाल्यानंतर शाळा सुरु करण्याच निर्णय कितपत योग्य असेल असा सवाल पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.


मुंबई आणि ठाण्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर तर दुसरीकडे 23 तारखेपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्याचे पूर्वीचे आदेश असल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कोविड आरटी-पीसीआर चाचणी केली जात असून त्यात अनेक शिक्षक पॉझिटिव्ह आढळत असल्याचं समोर आलं आहे.


कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह?
उस्मानाबादमध्ये झालेल्या चाचणीत 48 शिक्षक पॉझिटिव आढळले आहेत. तर नांदेडमध्ये एकाच शाळेतील अकरा शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय औरंगाबादमध्ये पंधरा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव असल्याचं समोर आलं आहे. बीड जिल्ह्यात 25 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.


शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे विद्यार्थी, पालकांची चिंता वाढली आहे. तर शाळा कशा सुरु करायच्या याबाबत प्रशासनामध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. त्यामुळेच मुंबईप्रमाणे कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेमुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय विविध जिल्हा प्रशासनाने घेतला तर त्यात आश्चर्य वाटायला नको.


शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित करावा : मराठवाडा शिक्षक संघाची मागणी
सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित करावा, अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. परळीचे तालुका सचिव बंडू आघाव यांनी राज्य सरकारकडून शाळा सुरु करु नयेत अशी मागणी केली आहे. शाळा सुरु करुन विनाकारण कोरोनाला निमंत्रण देऊ नये. शाळा सुरु केल्या तरी पालक आपल्या पाल्याला आताच्या परिस्थितीत शाळेत पाठवण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा आणि शिक्षण सुरु ठेवावे.


School Reopen Issue | राज्यातील अनेक जिल्ह्यांत शिक्षकांना कोरोनाची लागण