उस्मानाबाद : महाराष्ट्रातल्या एका मोठ्या शहरातली तरुणाई मेडिकलच्या दुकानात मिळणाऱ्या 'धुंदीच्या गोळ्यां'च्या आहारी गेली आहे. 'एबीपी माझा'च्या टीमने ही बाब पोलिसांपर्यंत पोहचवली. पोलिसांच्या तपासात या शहरात रोज हजारोंच्या संख्येनं गोळ्या विकल्या जात असल्याचं समोर आलं.

दुर्दैवाची बाब म्हणजे आमच्याकडे ही माहिती मिळेपर्यंत एका तरुणानं आत्महत्या केली होती. दोन तरुणांना सरकारी रुग्णालयात दाखल करावं लागलं. महाराष्ट्र सरकारला 'एबीपी माझा'चं आव्हान आहे, अशा शहरांचा शोध घेऊन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्या देणाऱ्यांवर कारवाई करा.

'माफ करा भावांनो...' फेसबुकवर अशी पोस्ट टाकून इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट धैर्यशीलनं रेल्वेखाली जीव दिला. अवघा महाराष्ट्र बंद असतानाही धैर्यशीलला हव्या त्या गोळ्या, हव्या तेवढ्या मिळाल्या.

धैर्यशीलचं कुटुंब सुखवस्तू... वडील एसटी महामहामंडळात कंट्रोलर... दहा एकर बागायती शेती... अभ्यासात हुशार असलेल्या धैर्यशीलला झोपेच्या गोळ्यांचं व्यसन जडलं. गेल्या वर्षी 5 मे रोजी गोळ्या खाऊन धैर्यशील कोमात गेल्यावरच घरच्यांना धैर्यशीलचं व्यसन कळलं.

दोन महिने उपचार केल्यावरही धैर्यशील पुन्हा धुंदीच्या गोळ्यांच्या आहारी गेलाच... नशेतच 3 जानेवारीला रेल्वेखाली झोकून देत धैर्यशीलनं जीव दिला..

वीस दिवसांपूर्वी 'एबीपी माझा'पर्यंत धैर्यशीलच्या कुटुंबाची आपबिती आली. पोलिसांना माहिती देऊन एबीपी माझाच्या टीमनं धुंदीच्या गोळ्यांचा बाजार शोधायला सुरुवात केली. दोनच दिवसात गोळ्याच्या आहारी गेलेल अनेक तरुण दिसू लागले.

अभय... वय वर्षे 19... अभयनं काही वर्ष व्यायाम करुन मजबूत शरीरयष्टी कमवली. पोलिसात भरती होण्याचं अभयचं स्वप्न. पण धुंदीच्या गोळ्यांचं व्यसन लागलं... शेतमजूर आई वडीलांचा हा एकुलता एक मुलगा. गोळ्यांसाठी हातावर ब्लेडनी वार करुन घेऊन स्वतःला जखमी करुन घेऊ लागला.

जीव देण्याची सतत धमकी देणाऱ्या अभयला मित्रांनी धरुन ठेवलं. पोलिसांना कळवलं. पोलिसांनीच अभयला सरकारी रुग्णालयात भरती केलं.

प्रवीण... वय वर्षे 25... प्रवीणला दोन वर्षांपासून गोळ्यांचं व्यसन जडलं. नशेबाजीमुळे इंजिनिअरिंग सुटलं... प्रवीणची आई धुणी-भांडी करते. वडील पिठाची चक्की चालवतात. प्रविणला रोज तीन गोळ्या खाल्ल्याशिवाय चालता येत नाही.

या गोळ्या मुलांच्या मेंदूवर आणि सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर परिणाम करतात. अँक्झायटी, डिप्रेशन, झोप न येणे या आजारांवर या गोळ्यांचे उपचार होतात. डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय या गोळ्या मिळत नाहीत. तरीही हे तरुण ज्या शहरात राहतात तिथे हजारोंच्या संख्येनं गोळ्या दिल्या, घेतल्या आणि खाल्ल्या जात आहेत.

धुंदीच्या गोळ्यांचा असा वापर महाराष्ट्रातल्या अनेक शहरात, सर्व स्तरात सुरु आहे. प्रश्न आहे तो अश्या गोळ्या विकणाऱ्यांचा, सप्लाय करणाऱ्या कंपन्यांचा... या मंडळींना जरब बसेल अशी कारवाई झाली नाही तर आणखी किती धैर्यशील जीव देतील, हे सांगता येणार नाही.