Shaktipeeth Expressway : कोणतीही मागणी नसताना आणि 12 जिल्ह्यातील सुपीक जमिनीचा नाश होणार असल्याने अत्यंत वादग्रस्त ठरत चाललेल्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज (12 मार्च) आझाद मैदानात  हजारो शेतकरी एकवटले.शक्तीपीठ महामार्ग विरोधात  विधानसभेवरती मोर्चा धडकणार आहे. या आंदोलनासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी एकवटले आहेत. शक्तीपीठ महामार्गविरोधातील आंदोलन समर्थन देण्यासाठी महाविकास आघाडीमधील नेते आझाद मैदानामध्ये पोहोचले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शक्तिपीठ महामार्ग विरोधात स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे सांगितले. आझाद मैदानात अंबादास दानवे, आमदार सतेज पाटील आणि जयंत पाटील यांनी संबोधित केले. जयंत पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावर बोलताना राजकीय टोलेबाजी करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर राजकीय टोलेबाजी केल्याने चर्चेचा विषय ठरला. 

अंबादास दानवेंकडून एकनाथ शिंदेंचा तो व्हिडिओ सादर

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शक्तीपीठवरून बदललेल्या भूमिकेचा समाचार घेताना तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ दाखवला. शक्तिपीठ नको असेल तर सरकार तुमच्या मनाविरोधात काम करणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. तो व्हिडिओ अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दाखवला. या सरकारचं कंत्राटदारांशी घेणदेणं असल्याचे ते म्हणाले. जनतेच्या भावना चिरडायच्या आहेत. मात्र, या लढ्यामागे आम्ही सगळे खंबीरपणे पाठीशी उभे राहू अशी ग्वाही दानवे यांनी दिली. 

सतेज पाटलांचा हल्लाबोल 

सतेज पाटील म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गाबद्दल राज्य शासनाच्या भूमिका वेगवेगळ्या होत्या. लोकसभेला निकाल लागला आणि शेतकऱ्यांचा राग निवळला असा भ्रम निर्माण केला. कोल्हापूरपुरता रस्ता रद्द झाल्याचा संभ्रम निर्माण केला. ते म्हणाले की 86 हजार कोटी वसूल करण्यासाठी 28 वर्षे लागतील. शक्तिपीठाला पाठिंबा करण्यासाठी त्या मार्गातील मंदिरांना दोन ते तीन कोटी द्या, म्हणजे तिथे येणाऱ्या भक्तना चांगली सुविधा मिळेल, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही तुमच्या पुढे दोन पाऊल असल्याचे ते म्हणाले. जे गरजेचं आहे त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला नाही. मात्र, हा रस्ता गरजेचा नाही त्यामुळे हा विरोध आहे. कोल्हापूरचा निर्णय झाला असला, तरी इतर जिल्ह्याच्या पाठीमागे आम्ही ठाम उभे आहोत. कोणी घरी जायला तयार राहू नका, मुक्काम करा, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे, निर्णय घेऊन घरी जाऊ असे ते म्हणाले. 

माझ्यावर विश्वास ठेवू नका, जयंत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य

जयंत पाटील म्हणाले की, सरकार नवे नवे रस्ते करण्यात का इंट्रेस्ट घेत हे कळत नाही. राजू शेट्टी यांना माहित आहे की, निवडणुकीमध्ये किती पैसे वाटले जातात. त्यांना चांगला अनुभव आहे. विकासासाठी आमचा विरोध नाही, पण ज्याची जमीन जात असेल त्यांचा उपजिविका संपून जाईल. इकडे तिकडे असं करू नका. आम्ही भाषण करुन दमलो, कारण लोकांना पैसे देऊन शांत केले जाते. निर्धाराने आला आहात, तर निर्धार टिकला पाहिजे. मोठी साखळी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे ठराविक चार सहा व्यक्तीना ट्रेंडर दिले जाते. आमचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे खात्री वाटतं नाही लोक ऐकतील की नाही. आपण यात विसरून जातो की अंगावरुन शक्तिपीठ जात आहे.  

माझ काही खर नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका  

जयंत पाटील मोर्चाला संबोधित करत असताना माझ काही खर नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका, असे वक्तव्य केल्याने भूवया उंचावल्या. माझा सल्ला राजू शेट्टी ऐकत नाहीत. आपली एकी कायम ठेवा संघर्ष करायला ठाम रहा,  मोजणीला अटकाव करा. आमचा दारुण पराभव झाला आहे. आम्ही बोलायचं हळूहळू कमी झालो आहे. कारण बोलून लोकांना काही समजत नाही. दुसरचं हिंदुत्व वैगरे समोर असतं, पण तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल. राजू शे्ट्टींनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका. माझ काही खरं नाही, माझा सल्ला शेट्टी ऐकत नाही, नाही तर ते आज खासदार झाले असते, असे ते म्हणाले.