Vishnudas Bhave Gaurav Padak Award : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक 2024 श्रीमती सुहास उर्फ सुहासिनी जोशी यांना जाहीर झाला. श्रीमती सुहास जोशी यांचे मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. यंदा दिले जाणारे हे 57वे भावे गौरव पदक आहे. गौरवपदक, रोख रक्कम 25 हजार स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे गौरवपदकाचे स्वरूप आहे. 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार जब्बार पटेल यांच्या हस्ते वितरण होणार आहे.


राजधानी दिल्लीमध्ये 98व्या होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांचा समस्त सांगलीकरांच्या वतीने या पुरस्कार सोहळ्यात नागरी सत्कार करण्यात येणार आहे. विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार हा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा पुरस्कार असून नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्याना हा पुरस्कार प्रदान केला जातो. गेल्या 55 वर्षांपासून हा नाट्यक्षेत्रातील मानाचा मानला जाणार पुरस्कार वितरित केला जात आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली ही संस्था गेली 80 वर्ष नाट्यक्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेतर्फे 5 नोव्हेंबर रंगभूमीदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगभूमीदिनाचे औचित्य साधून नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरवपदक देऊन सन्मानित करणेत येते. 


सुहासिनी तथा सुहास सुभाष जोशी यांची ओळख



  • जन्म : 12 जुलै 1947

  • सुहास जोशी या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. यांनी गेली अनेक वर्षे असंख्य मराठी नाटके, चित्रपट, हिंदी चित्रपट, तसेच मराठी आणि हिंदी टी व्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

  • कलेच्या प्रवासात त्यांना झी गौरव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, फिल्म फेअर अशा अनेक संस्थातर्फे जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

  • त्यांनी 25 मराठी नाटके, अनेक हिंदी आणि मराठी दूरदर्शन मालिका, मराठी - हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे.

  • आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारामध्ये नाट्य दर्पण, मराठी ग्रंथ संग्रहालय, व्हिडिओकॉन स्क्रीन पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा सह्याद्री नवरत्न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.

  • त्यांची जी गाजलेली नाटके रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत त्यातील काही खालीलप्रमाणे आनंदी गोपाल, नटसम्राट, डॉक्टर तुम्ही सुद्धा, प्रेमा तुझा रंग कसा, स्मृती चित्रे, अग्निपंख, इत्यादी. तसेच तू तिथे मी, आनंदी आनंद, मुंबई पुणे मुंबई असे गाजलेले मराठी चित्रपट आणि अनेक मराठी हिंदी दूरदर्शन मालिकांमध्ये काम केलेले आहे. याच बरोबर गेली काही वर्षे लहान मुलांसाठी नाट्य प्रशिक्षण वर्गाचे संचालन करीत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या