चंद्रपुरात रेल्वे मार्गावर वाघाचा तिसरा मृत बछडा आढळला
एबीपी माझा वेब टीम | 15 Nov 2018 06:37 PM (IST)
वरिष्ठ वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते या घटनेची चौकशी करत आहेत. दरम्यान, एकाच घटनेत 3 वाघाचे बछड्यांच्या मृत्यूच्या घटनेने वन्यजीवप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत.
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना-मामला मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चांदा फोर्ट रेल्वे मार्गावर तिसरा वाघाचा मृत बछडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनीच माहिती दिली आहे. माहिती मिळताच वरिष्ठ वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते या घटनेची चौकशी करत आहेत. दरम्यान, एकाच घटनेत 3 वाघाच्या बछड्यांच्या मृत्यूच्या घटनेने वन्यजीवप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना-मामला मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. ते दोन्ही बछडे अंदाजे सहा ते आठ महिन्यांचे असून दोन्ही मादी बछडे आहेत. विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर आतापर्यंत वाघ, बिबटे यांसारख्या अनेक प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र तरीही या मार्गावरील रेल्वेचा वेग कमी झालेली नाही. जुनोना जंगल परिसरात एक वाघीण आपल्या बछड्यांसोबत रेल्वे ट्रॅक ओलांडत होती. त्यावेळी बल्लारपूरवरुन गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाडीने या दोन बछड्यांना जोरदार धडक दिली. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे बल्लारपूर-गोंदिया रेल्वेमार्गावर दोन्ही बाजूला अतिशय घनदाट जंगल आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडताना आतापर्यंत अनेक वाघ, बिबटे, रानगवे, चितळ आणि रानडुक्कर यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे. रेल्वे विभागाला या मार्गावर रेल्वे गाड्यांची गती नियंत्रित करण्यासाठी अनेक वेळा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सूचनांकडे रेल्वे प्रशासन पूर्णत: दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची वाढती संख्या हा सर्वत्र चर्चेचा आणि आनंदाचा विषय आहे. सरकार हे आकडे सांगून स्वतःची पाठ देखील थोपटून घेतं. मात्र अपघातामुळे वाघांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.