पंढरपूर : करमाळा तालुक्यात पाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी समोर आली. एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सोबत तलवारी घेतलेल्या गुंडाच्या मदतीने करमाळ्यातील सावडी ग्रामस्थांना दमबाजी करतानाच्या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे .



सावडी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या करमाळा तालुक्यात दुष्काळ असल्याने कुकडी नदीचे पाणी ओढ्यातून विहिरीत साठवून घेण्याचा ग्रामस्थ प्रयत्न करीत होते. पुणे जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने याच गावात शेतजमीन खरेदी केली आहे. शेततळ्यात पाणी नेण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने गावाकडे जाणारे पाणी वाळवून आपल्या शेताकडे नेण्यास सुरुवात केली. मात्र पाणी वळवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला.


ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यासोबत तलवारी घेऊन असणाऱ्या गुंडानी ग्रामस्थांना धमकावण्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांना जिवंत मारण्याच्या धमक्याही या गुंडांनी दिल्या. उपस्थित पोलीस अधिकारी त्यांना चिथावणी देत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.


संपूर्ण प्रकाराने घाबरलेल्या सावडी ग्रामस्थांना प्रहार संघटनेने धीर दिला. त्यानंतर आज ग्रामस्थांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांकडे दमदाटी करणाऱ्या पोलीस अधिकारी दत्तात्रय मदनेची तक्रार केली.


मात्र ज्या पोलिसांकडे जनतेच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी आहे. तेच पोलीस गुंडांना हातीशी धरुन सामान्य जनतेवर दबंगगिरी करू लागले, तर त्यांनी जायचं कुठे? असा प्रश्न निर्माण होत आहे. गरीब शेतकऱ्यांना दमदाटी करून दहशत निर्माण करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यावर गृह खातं काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.