नागपूर : चोरलेले साहित्य कोणाच्या नजरेस येऊ नये, यासाठी चोर वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. मात्र नागपुरात तीन बाईक चोरांनी चोरलेल्या बाईक लपवण्यासाठी वापरलेली शक्कल सर्वाना थक्क करणारी आहे. चोरलेली बाईक विक्री होण्यापूर्वी पोलिसांच्या नजरेपासून लांब ठेवण्यासाठी चक्क महापालिकेच्या मॅनहोल्स आणि सीवर लाईनचा वापर केला.
नागपुरातील कैकाडे नगर भागातील हे मॅनहोल आहे. साधारणपणे महापालिकेच्या अशा मॅनहोल्समधून दुर्गंधीयुक्त कचरा बाहेर पडतो. मात्र इथे चोरी गेलेल्या बाईकचा खजिनाच सापडला आहे.
सोनेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत मनीषनगर, बेसा तसेच नागपूर शहरातील इतर भागातून गेल्या काही दिवसात अनेक बाईक चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांचे पथक बाईक चोरांच्या मागावर होतेच. परिसरातील नागरिकांकडून तीन संशयित युवकांबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. 14 जुलै रोजी प्रतीक गिरी, तेजलाल बिसेन आणि एक विधी संघर्ष बालक कैकाडे नगर भागात नव्या सावजच्या शोधात असताना पोलिसांच्या हातात लागले. त्यांच्याकडून चौकशी केली असता तिघांनी नागपुरात 8 बाईक चोरल्याची कबुली दिली.
बाईक चोरल्यानंतर हे चोरटे कधीच ती बाईक घटनास्थळी चालू करत नव्हते. तर ती बिघडली आहे किंवा पेट्रोल संपले आहे, असे सोंग धरत ती पायीच लांबपर्यंत न्यायचे आणि तिथे ती चालू करून पळ काढायचे. खरेदीदार मिळेपर्यंत ती बाईक लपवून ठेवायचे किंवा दुसऱ्या शहरात नेऊन नव्या चोऱ्यांसाठी ती बाईक वापरायचे अशी माहिती तिघांनी पोलिसांना दिली.
दरम्यान, चोरलेल्या बाईक कुठे लपवल्या याची माहिती पोलिसांनी विचारताच तिघांनी दिलेले उत्तर पोलिसांना ही थक्क करणारे होते. तिघांनी चोरीचे माल लपवण्यासाठी चक्क महापालिकेचे मॅनहोल आणि एक सुकलेली सीवर लाईनचा (गटार) वापर केला होता. तर काही बाईक्स जवळच एका झुडुपातही लपवल्या होत्या.
उन्हाळ्याच्या दिवसात महापालिकेचे मॅनहोल्स सुकलेले असतात. त्यांच्यामधून पाणी वाहत नाही. महापालिकेचे कर्मचारीही त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे चोरीचे साहित्य लपवण्यासाठी तेच सर्वात सुरक्षित स्थान मिळाल्याची माहिती चोरट्यांनी पोलिसांना दिली असली तरी त्यांचे महापालिकेबद्दलचे तर्क पालिकेच्या स्वच्छता विषयक कार्यपद्धतीची खिल्ली उडविणारे आहे.
चोरलेल्या बाईक लपवण्यासाठी महापालिकेच्या मॅनहोलचा वापर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2017 04:43 PM (IST)
चोरलेली बाईक विक्री होण्यापूर्वी पोलिसांच्या नजरेपासून लांब ठेवण्यासाठी चक्क महापालिकेच्या मॅनहोल्स आणि सुकलेल्या गटाराचा वापर केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -