नाशिक :नाशिकमध्ये एकच रात्रीत 2 एटीएम फोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बुधवारी रात्री चोरांनी जेलरोडमधील एसबीआयचं फोडलं. त्यानंतर काही वेळाने मखमलाबादमधील एसबीआयच्या एटीएमवरही चोरट्यांनी दरोडा टाकला. जेलरोड येथील एटीएममधील 13 लाख तर मखमलाबादमधील एटीएममधले 31 लाख 75 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत.
हे दोन्ही एटीएम गॅस कटरने फोडण्यात आले आहेत. मखमलाबादमधील एटीएममधून बुधवारी कोणताही व्यवहार न झाल्याने बँकेला शंका आली, तेव्हा तिथेही दरोडा पडल्याचे बँकेच्या लक्षात आले. दरम्यान दोन्ही एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक का नव्हता असा सवालही उपस्थित केला जात आहे.
बुधवारी पहाटे जेलरोड परिसरातील शिवाजीनगरच्या एटीएममधून 13 लाख 30 हजार रुपये चोरीला गेले होते. सकाळी काही ग्राहक पैसे काढण्यासाठी तिथे गेले असता हा प्रकार समोर आला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळीदेखील मखमलाबाद गावातील एसबीआयचेच एटीएम फोडून चोरांनी तब्बल 31 लाख 45 हजार रुपयांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. हे एटीएमदेखील बुधवारी पहाटे फोडण्यात आल्याची बाब समोर आली आहे. चोरांनी एटीएमचे शटर बंद करुन ठेवल्याने हा प्रकार उजेडात आला नव्हता.
बुधवारी दिवसभर या एटीएममधून कोणताही व्यवहार न झाल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी याबाबत गुरुवारी शहानिशा केली असता हे एटीएमदेखील गॅस कटरच्याच सहाय्याने कापून चोरी झाल्याचे समोर आले आहे.
मखमलाबाद परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरात चोरीची दृश्यं कैद झाली असून त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे याही एटीएमबाहेर बँकेकडून सुरक्षारक्षकाही नेमणूक करण्यात आलेली नसल्याने एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
नाशिकमध्ये दोन एटीएमवर दरोडे, लाखो रुपये लंपास
एबीपी माझा वेब टीम Updated at: 22 Aug 2019 05:46 PM (IST)