नागपूर: यूट्यूबवर व्हिडीओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लक्ष्मण जयसिंगपूरे असं आरोपीचं नाव आहे. लक्ष्मण हा व्यवसायाने टेलर आहे.


लक्ष्मणने  काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर गॅस कटर आणि वेल्डिंग मशीनच्या मदतीने एटीएम फोडण्याचे तंत्र शिकवणारे व्हिडीओ त्याने पाहिले होते. आर्थिक चणचणीत असलेल्या लक्ष्मणने हेच तंत्र वापरुन एटीएम फोडून एकाच झटक्यात लाखो रुपये कमावण्याची योजना आखली.

मग त्याने टेलरिंगचं काम बाजूला ठेवून, काही दिवस वर्कशॉपमध्ये काम करत, वेल्डिंग मशीनचं काम शिकला. मग त्याने स्वत: गॅस कटर मशीन,वेल्डिंग सिलेंडर आणि अन्य साहित्य खरेदी केले.  हे साहित्य एटीएमपर्यंत नेण्यासाठी मोठ्या आकाराची बॅग शिवून घेतली.

ही सर्व तयारी पूर्ण केल्यानंतर लक्ष्मण जयसिंगपुरेने जुलै महिन्यात पहिल्यांदा सीए रोडवर आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अपयश आले. त्यानंतर आणखी तयारी करुन लक्ष्मणने दारोडकर चौकावर डिसीबी बँकेचे आणि वैशाली नगरात युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पुन्हा अपयशी ठरला.

वर्धमान नगर भागात एका एटीएम सेंटरमध्ये रेकी करताना आरोपी लक्ष्मणचे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पूर्व नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये मोठ्या आकाराची बॅग घेऊन फिरणाऱ्या आरोपीचा शोध सुरु केला आणि लक्ष्मण जयसिंगपुरे पोलिसांच्या हाती लागला.