पंढरपूर : समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक मंदिरात येतात. यावेळी गर्दीचा फायदा घेत काही चोर भाविकांचे दागिने आणि पैशांची पाकिटे लंपास करतात. असाच एक चोर त्याच्या वेगळ्याच हौसेमुळे पोलिसांच्या जाळ्यात अ़डकला आहे.


हा चोर दररोज भाविकांचे दागिने आणि पैशांची चोरी करायचा. चोरीचा माल ठेवण्यासाठी दररोज नवीन पिशवी खरेदी करायचा. त्याच्या या दरोजच्या नव्या पिशवीच्या खरेदीमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या चोराला पोलिसांनी आता जेरबंद केले आहे.

गणेश लोखंडे असे या चोराचे नाव आहे. दररोज नवीन पिशवी घेण्याच्या हौसेमुळे हा चोरटा गोत्यात आला आहे. पंढरपूरातील विठ्ठल मंदिर परिसर, मुख दर्शन रांग, नामदेव पायरी या भागात दर्शनासाठी मोठी झुंबड उडालेली असती. लोखंडे या गर्दीचा गैऱफायदा घेऊन लोकांना लुबाडायचा.

लोखंडे भाविकांच्या रांगांमध्ये सहभागी व्हायचा. सोबत एक पिशवी आणत होता. भाविक देवाच्या दर्शानासाठी वाकल्यानंतर त्यांच्या खिशातली पाकिटे, महिला भाविकांच्या पर्स आणि दागिने क्षणार्धात लंपास करत होता. चोरलेल्या वस्तू स्वतःजवळच्या पिशवीत ठेवत होता. त्यानंतर गर्दीत मिसळून शांतपणे तो मंदिराच्या बाहेर पडत होता.

असा सापडला चोर

नामदेव पायरीजवळ एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची तक्रार आल्यावर मंदिर बंदोबस्तात असलेल्या पोलीस हवालदार यमगर यांनी मंदिरातील cctv ची तपासणी केली. तपासणीदरम्यान त्यांनी गणेश लोखंडेला संशयास्पद हालचाली करताना पाहिले. तसेच दररोज त्याच्या हातात दिसणाऱ्या नवीन पिशवीचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली.

लोखंडेवरचा संशय अधिक वाढल्यानंतर पोलिसांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याने आपण भाविकांच्या पर्स, पाकिटे आणि दागिने चोरत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडे असलेली मोटारसायकल आणि मोबाईल जप्त केला असून चोरी केलेली रक्कम आणि दागिन्यांचा तपास सुरु आहे.

लोखंडे पोलिसांच्या तावडीत सापडल्यामुळे विठ्ठल मंदिरात चोरी करणाऱ्या अजून सहा चोरट्यांना पोलिसांनी पकडले आहे. लोखंडे आणि इतर चोरांकडे चौकशी केल्यानंतर मंदिर परिसरात चोरी करणाऱ्या टोळ्यांची माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.