पंढरपूर : राज्यात आणि देशात सध्या दडपशाहीचे वातावरण असून सरकार विरुद्ध बोलणाऱ्याचे आवाज बंद केला जात आहे. आणीबाणीच्या विरोधात बोलणाऱ्यांनी आता देशात आणि राज्यात तसेच वातावरण बनविल्याचा घणाघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
सुप्रिया सुळे यांची पंढरपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. जे सरकारविरोधात बोलतात त्यांच्या विरोधात ईडीची नोटीस, सीबीआय चौकशा, रेड अशारीतीने धमकीसत्र सुरु असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी लक्ष केलं. ज्यांना ईडी, सीबीआय, साखर कारखाने आणि बँका याची भीती आहे, तेच पक्ष सोडत आहेत. एकाही निष्ठावंत कार्यकर्त्याने पक्ष सोडलेला नाही. राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरचा विश्वास संपला का? असा थेट सवाल केल्यावर तसे नसून यातील एकही नेत्याने जाताना पक्ष नेतृत्व अथवा पक्षावर टीका केलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. राज्यापुढे खूप मोठे प्रश्न असताना कोण कुठे जातो याची चर्चा होणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
ईव्हीएमवर संशय कायम
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याबाबत तपास करायचा अधिकार सीबीआयला आहे. मात्र ज्यापद्धतीने कुंपणावरुन उड्या मारुन अधिकाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश केला, हे खटकणारे असल्याचा टोला सुळे यांनी लगावला. कर्नाटकमध्ये ईव्हीएम मशीनवरील मतदानात भाजप जिंकला आणि नंतर 8 दिवसात नगरपालिका निवडणूक बॅलेट पेपरावर झाल्या त्यामध्ये काँग्रेस मोठ्या फरकाने जिंकला. यामुळेच मशीनवरील मतदानाबाबत शंकेची पाल चुकचुकते असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
बाळासाहेबांचे संस्कार उद्धव ठाकरे विसरले नाहीत, हे पाहून आनंद वाटला. भाऊच भावाच्या चांगल्या-वाईट वेळेत सोबत राहतो, ही आपली संस्कृती उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिली. मात्र सत्तेत सोबत करताना चुकीच्या गोष्टींवर आवाज उठावा, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.