Maharashtra Politics: राष्ट्रवादी पक्ष संघटनेत लवकरच भाकरी फिरणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी पक्ष संघटनेत तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष पदावर असणाऱ्यांना बदलण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून विभागवार शिबिरं घेण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीच्या शिबिरांमध्ये राज्यातील प्रश्नांवर देखील चर्चा करण्यात येणार आहे.


राष्ट्रवादीकडून 10 जूनला अहमदनगर जिल्ह्यात भव्य सभेचं आयोजन


राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी, म्हणजेच येत्या 10 जूनला राष्ट्रवादीकडून अहमदनगर जिल्ह्यात भव्य सभेचे  आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आणि छत्रपती राज्याभिषेक दिवस एकत्र साजरा करण्यात येणार आहे. यावेळी, राष्ट्रवादीत तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पदावर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बदलले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 


महाविकास आघाडी भक्कम ठेवा, शरद पवारांच्या आमदारांना सूचना


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (17 मे) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा मुद्दा हा केंद्रस्थानी होता. बैठकीत शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी भक्कम ठेवा, लोकसभा आणि विधानसभा एकत्रितच लढवायच्या आहेत, असे शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.


महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय?


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतून एकत्र लढण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कोअर कमिटीच्या बैठकीत केली, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पण मुंबईसह विविध महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय असणार, याविषयी सूतोवाच करण्यात आलेलं नाही.


निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विभागवार जबाबदारी


मागील लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, त्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यावर विभागवार जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार, जितेंद्र आव्हाडांवर ठाणे-पालघरची, धनंजय मुंडेंवर नाशिक, नगरसह मराठवाड्याची, अनिल तटकरे आणि शेखर निकमांवर कोकणची, तर अनिल देशमुखांवर विदर्भातल्या नागपूर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजेंद्र शिंगणेंवर विदर्भातल्या अमरावती विभागाची, शशिकांत शिंदेंवर सांगली, सातारा आणि कोल्हापूरची जबाबदारी, तर सुनील शेळकेंवर पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.


विदर्भ (नागपूर विभाग)
अनिल देशमुख


विदर्भ (अमरावती विभाग) 
राजेंद्र शिंगणे


कोकण विभाग (ठाणे, पालघर)
जितेंद्र आव्हाड


मराठवाडा विभाग (नाशिक, नगर)
धनंजय मुंडे


पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर, सातारा,सांगली) 
शशिकांत शिंदे


पश्चिम महाराष्ट्र (पुणे)
सुनील शेळके


पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर)
अशोक पवार


हेही वाचा:


Karnataka CM : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब? मंत्रिमंडळाबाबत काँग्रेसकडून महत्त्वाची माहिती