अहमदनगर : खातेवाटपावरून राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा शरद पवार यांनी फेटाळली आहे.  गृहमंत्री पदासाठी आमच्याकडेच नाही म्हणणारे जास्त आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी खातेवाटपावरून गुगली टाकली आहे. खातेवाटपाबद्दल कुठलीही नाराजी नाही, आज किंवा उद्या खातेवाटप होईल, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.


'मंत्रिपद मिळाले नाही म्हणून पक्षात कोणीही नाराज नसून गृहमंत्री आमच्याकडे नको असे म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खातेवाटपाबाबत 8 दिवसांपूर्वीच निर्णय झालेला असून तरुणांना जास्त संधी देण्यात आली आहे', असे शरद पवार यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पर्यंत खातेवाटप जाहीर करतील असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Sharad pawar | खात्यांबाबत कुठलीही नाराजी नाही : शरद पवार | ABP Majha



शरद पवार अहमदनगर येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पवार यांनी राज्यसभेचे खासदार डी पी तिवारी यांच्या निधनाबद्दल देखील शोक व्यक्त केला. हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेला आणि मोठा व्यासंग असलेला सहकारी हरपल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

बुधवारी (1 जानेवारी)  दिवसभरात तीन बैठका आणि तब्बल चार तासांच्या खलबतानंतर महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप गुरूवारी (2 जानेवारी)  होणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.  मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस नेते प्रमुख खात्यांसाठी आग्रही आहेत. त्यावरुन मागणी योग्य असली तरी तुटेपर्यंत ताणू नये, असा सूचनावजा सल्लाच अजित पवारांनी काँग्रेसला दिला आहे. खातेवाटपाची यादी तयार आहे, आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप होईल असा दावा अजित पवार यांनी केला. खाते वाटपात कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचा पुनरुच्चार जयंत पाटील यांनी केला आहे.

संबंधित बातम्या : 

EXCLUSIVE : खातेवाटपासाठी मुख्यमंत्र्यांकडून नाही तर आघाडीतील पक्षांकडून उशीर, संजय राऊतांचा दावा
नव्या 36 मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप, अजित पवारांना देवगिरी तर अशोक चव्हाणांना मेघदूत