मुंबई : खातेवाटपासून महाविकास आघाडीमध्ये कुठलीही कुरबूर नाही. आज संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर होईल, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या शिवसेना नेत्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधून मार्ग काढतील, असेही त्यांनी बोलताना सांगितले आहे.
संजय राऊत बोलताना म्हणाले की, 'महाविकास आघाडीमध्ये खातेवाटपावरून कुरबुरी आहे, असं म्हणता येणार नाही. पक्षांनुसार खातेवाटप आधीच झालेले आहे. आता जी नाराजी आहे ती त्या त्या पक्षातील अंतर्गत खातेवाटपावरून आहे. हे सरकार तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केले आहे, हे विसरता येणार नाही. तसेच मुख्यमंत्र्यांकडूनही खातेवाटपाबाबत विलंब झालेला नाही. सध्या सुकाणू समितीच्या माध्यमातून समन्वय साधला जात आहे. आज संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होईल.'
महाराष्ट्रातील सत्तापेच सुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक दिवस मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर 30 डिसेंबर रोजी महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महूर्त सापडला. महाविकास आघाडीतील 26 आमदारांनी कॅबिनेट तर 10 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दोन दिवस उलटत नाहीत तोच शिवसेनेत नाराजी नाट्य सुरु झालं आहे. शिवसेनेच्या नाराज आमदारांनी आपली नाराजी उघडपणे दाखवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतील डझनभर आमदार नाराज असल्याचं वृत्त समोर येत आहे. अशातच विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री देण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे खासदार संजय राऊतही नाराज असल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यांचा भाऊ आमदार सुनिल राऊत यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश नसल्याने संजय राऊत नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी सोहळ्यालाही संजय राऊत अनुपस्थित असल्यामुळे संजय राऊत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, नाराजीनाट्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊत यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आहे.
उध्दव ठाकरे दिलेला शब्द पाळणारच
शिवसेनेतील अनेक नेते नाराज असल्याच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, 'शिवसेनेनं अपक्षांना, सहकारी घटकांना समावून घेतल्यानं शिवसेनेतल्या नेत्यांना आपल्यावर अन्याय झाला आहे, असं वाटतंय पण, मला वाटतं हे चूकीचं आहे. प्रत्येकाला इच्छा असते ती इच्छा असणं चूकीचं नाही. तसेच उध्दव ठाकरे यांनी जर कोणाला शब्द दिला असले तर तो ते पाळणारचं, त्यामुळे जर कोणी म्हणत असले की, त्यांनी तो पाळला नाही तर त्यावर माझा विश्वास नाही. सत्ता आपल्याकडे आहे, अजून वेळ गेलेली नाही. त्यामुळे थोडीफार नाराजी असले पण उध्दव ठाकरे संवाद साधून यातून नक्कीच मार्ग काढतील.' तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, दिवाकर रावते, दिपक केसरकर, रामदास कदम हे आमचे जेष्ठ नेते आहेत. यांनी आधीही मंत्रीपदं भूषवली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना अडचण निर्माण होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत.'
काँग्रेसमध्ये राडा होणं ही त्यांची संस्कृती नाही
काँग्रेसकडून होणाऱ्या कृषी किंवा ग्रामीण भागांतील खात्याच्या मागणीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'काँग्रेस आणि शिवसेनेत कृषी खात्यावरून रस्सीखेच नाही. महसूल खातं, बांधकाम खातं, शिक्षण, आरोग्य ही खाती काँग्रेसकडे आहेत. अशी माहिती माझ्याकडे आहे. तसेच कोणतंही खातं मिळालं तरी ते जनतेशी संबंधितच असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुण्यात केलेल्या तोडफोडीवर बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये असा राडा होणं ही त्यांची संस्कृती नाही. शिवसेना राडेबाज आहे, असे आरोप व्हायचे. हा प्रश्न आता प्रश्नांतर्गत नाही तर शांतता सुव्यवस्थेचा आहे.'
खडसेंच्या वक्तव्यावर मत व्यक्त करणं चुकीचं
'एकनाथ खडसे भाजपच्या माध्यमातून अनेक वर्ष राजकरणात आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षांतील लोकांसंदर्भात केलेलं विधान आहे. ती त्यांच्या पक्षातील अतंर्गत बाब आहे. त्यामुळे खडसे बोलत असलेल्या गोष्टिंवर कोणीही मत व्यक्त करणं चुकीचं आहे. गुलाबराव आणि खडसे एकाच जिल्हातील आहेत. त्यामुळे त्यांचा जास्त संपर्क असेल. एकनाथ खडसे याआधी उद्धव ठाकरे भेटले होते. जेव्हा दोन प्रमुख नेते भेटतात तेव्हा राजकिय चर्चा होतेच. खडसे पवारांनाही भेटले होते. काय निर्णय झालाय मला माहित नाही, पण सेनेकडेच कशाला ते पवारांकडेही जाऊ शकतात.'