मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाचा इशारा दिलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मराठा वादळ नवी मुंबईच्या (Navi Mumbai) वेशीवर आज धडकणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवर पळापळ सुरू झाली आहे. एका बाजूला नवी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) मनतरंगी यांची मन धरणी सुरू असताना राज्य सरकारकडूनही शिष्टमंडळ पाठवत मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अजूनही दोन्ही बाजूंनी कोणताही सकारात्मक तोडगा निघालेला नाही, त्यामुळे उद्यापासून मुंबईमधील आझाद मैदानात (Azad Maidan) आंदोलन सुरु करणार असल्याचे अटळ आहे. 


आझाद मैदानात व्यासपीठ उभारणीचे काम सुरुच 


आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी परवानगी दिली नसली, तरी आझाद मैदानात तयारीसाठी मात्र नारळ फोडला गेला आहे. याठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यासाठी काम सुरू आहे. परवानगी नसतानाही या ठिकाणी व्यासपीठ उभं करण्याचं काम सुरू आहे. कोणताही अडथळा या कामांमध्ये आणला गेलेला नाही. त्यामुळे उद्या या ठिकाणी मनोज जरांगे पाटील ध्वजारोहण करून आंदोलनात सुरुवात करतील अशी स्थिती आहे.


दरम्यान, मुंबई पोलिसांकडून आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. पोलिसांनी समजूत घालूनही त्यांनी दाद दिलेली नाही. मनोज जरांगे यांनी आज लोणावळ्यातून नवी मुंबईच्या दिशेनं कूच केल्यानंतर वाटेत नवी मुंबई पोलिसांचे पथक त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी या भागातील आपल्याला कोणतीच माहिती नसल्याचे सांगत आयोजकांकडे चेंडू ढकलला. त्यामुळे आयोजकांमध्ये आणि पोलिसांमध्ये आता चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांच्या ताफ्याचा मार्ग बदलणार का? हे स्पष्ट होणार आहे. 


पोलिसांनी परवानगी का नाकारली? 


दुसरीकडे, पोलिसांनी दिलेल्या पत्रात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे 7000 स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. त्याची क्षमता 5000 ते 6000 आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही व त्याप्रमाणात सोयी सुविधा देखील तेथे नाहीत. त्यामुळे आपण लाखोच्या संख्येने आंदोलक व वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या