नवी दिल्ली : रामलीलावर जनलोकपालसह इतर मागण्यांवर सुरु असलेल्या उपोषणावर भाजपची छुप्या पद्धतीने नजर आहे, असा गंभीर आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कोअर कमिटीने केला आहे. अण्णांचं दिल्लीतील रामलीला मैदानावर पाचव्या दिवशीही उपोषण सुरुच आहे.


अण्णांच्या कोअर कमिटीने भाजप आणि पोलिसांवर हा आरोप केला. आंदोलनात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं आऊटपुट दिल्ली भाजप कार्यालयाला दिलेलं आहे. आंदोलनस्थळी असलेल्या सीसीटीव्ही रुममधील स्क्रीनवर BJP office असं लिहून येत आहे, असा आरोप कोर कमिटीचे सदस्य नवीन जयहिंद यांनी केला.

विशेष म्हणजे नवीन जयहिंद यांनी जो आरोप केला, ते नाव सीसीटीव्ही रुममधील कम्प्युटरमध्येही दिसत आहे. त्यामुळे भाजप मुख्यालयातून अण्णांच्या आंदोलनावर छुप्या पद्धतीने नजर ठेवण्यात येत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सरकार ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच राहिल, अशी भूमिका अण्णांनी घेतली आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णांच्या संपर्कात आहेत. मात्र अण्णांचं मन वळवण्यात त्यांना अजून यश आलेलं नाही. कारण, अण्णा तोंडी नव्हे, तर लेखी आश्वासनांवर ठाम आहेत.

अण्णांशी सरकारचे प्रतिनिधी आज पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर भूमिका ठरवू, असं अण्णांनी सांगितलं. शिवाय काही ठोस निर्णय घेणार असाल, तरच भेटायला या, असंही अण्णांनी बजावलं आहे.