सोलापूर : आगामी निवडणुकीसाठी मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आलेला आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात मतभिन्नता आहे. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी आणि केंद्रातील नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. संत सेवालाल जयंतीनिमित्त सोलापुरातील मुळेगाव तांडा येथे बंजारा समाजाच्या वतीने आयोजित मेळाव्यासाठी अशोक चव्हाण उपस्थित होते.
अजित पवार आणि राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर अजित पवार सांगितले होते की, मी राज ठाकरेंना भेटलो. संवाद झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे म्हणून आमची भेट झाली. मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत काँग्रेसला कळवलं आहे. आम्हीही वरिष्ठांना कळवू, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. पुढे अजित पवार म्हणाले की, जागांबाबत चर्चेचा प्रश्नच नव्हता. आधी दोन्ही पक्षांनी मनसेला आघाडीत घेण्याबाबत स्वीकारलं पाहिजे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आघाडीसोबत आले तर फायदाच होईल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलं होतं.
अशोक चव्हाणांची भाजप सरकारवर टीका
यावेळी अशोक चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली. दुष्काळाच्या फक्त घोषणा झाल्या, मात्र मदत काही मिळाली नाही. राज्यातील बेरोजगारी वाढतच चालली आहे. मात्र सरकारकडे कोणतीही उपाय योजना नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. बंजारा समाजच्या विविध मागण्या मेळाव्यात मांडण्यात आल्या.
याआधी सत्तेत असताना बंजारा समाजाच्या विविध मागण्या मान्य केल्या होत्या. जर पुन्हा सत्तेत आलो तर सर्व मागण्या पूर्ण करु, असं आश्वासन सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं.
संबंधित बातम्या
महाआघाडीत मनसे?, अजित पवार, राज ठाकरेंमध्ये गुप्त बैठक
राज ठाकरे आघाडीत आले तर फायदाच होईल : छगन भुजबळ