बुलडाणा : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बुलडाण्याचे जवान नितीन राठोड यांचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. नितीन राठोड सुट्टीवर असताना आपल्या गावी त्यांनी हा व्हिडीओ शूट केला होता.
बॉर्डर सिनेमातील 'संदेसे आते है...' या गाण्यावर आधारित हा व्हिडीओ आहे. मन हेलावून टाकणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शहीद नितीन राठोड यांना सेल्फी घेण्यासोबतच टिक टॉकवर व्हिडिओ बनवण्याची आवड होती.
नितीन राठोड यांच्या पार्थिवारवर काल बुलडाण्यातील गोधर्वन नगर, तालुका लोणार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी श्रीमती वंदना शिवाजी राठोड, मुलगा जीवन वय 10 वर्ष व मुलगी जिविका वय 5 वर्ष, आई सावित्रीबाई , वडील शिवाजी रामू राठोड, दोन बहीण आणि एक भाऊ प्रवीण राठोड असा परिवार आहे.
14 फेब्रुवारी (गुरुवारी) हा हल्ला झाला होता. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
व्हिडीओ