नागपूर: होळीच्या रात्री पोलिस ठिकठिकाणी रस्त्यांवर हुल्लडबाजांचा बंदोबस्त करण्यात व्यस्त असताना नागपूर आणि जवळच्या सावनेरमध्ये चोरट्यांनी अक्षरश: धूमाकुळ घातला. यावेळी चोरट्यांनी तब्बल 18 लाखांचे मोबाईल फोन चोरले. विशेष म्हणजे 5 ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांमागे चार चोरांची एकच टोळी असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे हे चोर 13 मार्चच्या रात्री चोरी करण्यासाठी एका कार मध्ये फिरत होते. ही चौकडी काही ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मोठ्या लोखंडी सळीच्या मदतीने दुकानांचे शटर वाकवून हे चोरटे दुकानात घुसत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

सुरुवातीला या चोरट्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तृप्ती एन्टरप्राईजेस मधून २ लाखांचे मोबाइल चोरले. त्यानंतर शेजारीच असलेल्या ‘ए टू झेड’ मोबाईल शॉपमधून तब्बल १० लाखांचे मोबाइल लंपास केले. एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मधून ५ लाख ३५ हजारांचे मोबाइल आणि त्याच्याच शेजारी असलेल्या हर्ष मोबाईलमधून ४ हजार रूपये चोरले आणि नागपूर शहरातून सावनेरकडे पसार झाले..

शेवटी सावनेरमधील गुरुकृपा मोबाईल कलेक्शन मध्ये देखील त्यांनी ८० हजारांच्या महागड्या मोबाईल फोनवर हात साफ केला. रात्री 1 ते 3च्या दरम्यान या सर्व दुकानात चोऱ्या झाल्या आहेत. दरम्यान, सावनेरमध्ये दुकान फोडल्यानंतर हे चोरटे पुढे मध्यप्रदेशात पळून गेले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस या चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.