अहमदनगर: अहमदनगरमधील पाथर्डीत दहावी-बारावीच्या परीक्षेत चारशेहून अधिक विद्यार्थी इतर जिल्ह्यातून आले आहेत. पाथर्डी पॅटर्नमध्ये शिक्षण घेण्यासाठी कोणी मुंबईवरुन आलं आहे. तर काहीजण विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील आहेत. कोण पार लांब कोकणातून, तर काही विद्यार्थी मराठवाड्यातून आले आहेत. त्यामुळे पाथर्डी म्हणजे शिक्षणाची पंढरीच झाली असंही काहीजणांना वाटेल. पण, तसं मुळीच नाही. तर हे विद्यार्थी पाथर्डीच्या शिक्षण पॅटर्नसाठी नाही तर पाथर्डी कॉपी पॅटर्नसाठी येतात.
दहावी बारावीत इथं विद्यार्थ्यांना भरघोस मार्कानं पास करुन देण्याची गॅरेंटी असते. त्यात मोठा आर्थिक व्यवहारही होतो. संस्थाचालकांसोबत परीक्षेच्या काळात हॉटेल चालकांनाही अच्छे दिन आले आहेत.
संस्थाचालकांना इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून मुबलक पैसा मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यासाठी तज्ज्ञ मंडळीचा फौजफाटा सज्ज असतो. धक्कादायक गोष्ट म्हणजे इथं शिक्षक आणि पोलिसांची बघ्यांची भूमिका असते. पण शिक्षण विभागाला यात काहीही गैर वाटत नाही.
पण या सगळ्या प्रतापामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप होतो. गेल्या दोन वर्षांपासून पाथर्डीत हा शिक्षणाचा बाजार सुरु आहे. शिक्षण विभाग, संस्थाचालक आणि धनाढ्य पालकांच्या अभद्र युतीमुळे हे शक्य होतं आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न आहे.