विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यासाठी चोरी
एबीपी माझा वेब टीम | 22 Sep 2016 04:14 PM (IST)
पुणे: विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यासाठी पैसे हवेत, असं सांगून एका अल्पवयीन मुलाच्या घरात चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. भारत किसन पवार असं आरोपीचं नाव आहे. त्याचा एक साथीदार पसार आहे. काय आहे प्रकरण? पुण्यात मंगळवार पेठेत पवार कुटुंब राहतं. त्यांचा मुलगा परिसरातील एका मंडळाचा कार्यकर्ता. या मंडळातील भारत पवार आणि साळुंखे नावाच्या तरुणांनी वेगळाच कट आखला होता. पवारांचा मुलगा हौशी होता, त्यामुळे आपल्याही मंडळाच्या बाप्पासमोर भन्नाट डीजे वाजावा अशी त्याची इच्छा होती. मात्र पैसे नसल्याने मिरवणूक काढणे शक्य नव्हते. आरोपींनी पवारांच्या मुलाला भावनिक आवाहन केलं. आपल्या बाप्पाची जंगी मिरवणूक काढायची तर पैसे हवेत. तुझ्या घरी खूप सोने आहे, ते कुठे ठेवतात त्याची माहिती घे, आपण मिरवणुकीत डीजे लावू, असं त्याला सांगितलं. त्यानंतर पवार कुटुंब परगावी गेल्यानंतर, आरोपींनी त्यांच्या घरातील सोन्यावर हात साफ केला. यानंतर पवार कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पण काहीच सुगावा लागेना. मग घरातल्याच एका अल्पवयीन मुलाची कसून चौकशी सुरु झाली आणि बिंग फुटलं. डीजेसाठी या मुलांनी चोरी केल्याचं उघड झालं. पुण्यात घरफोडीच्या अनेक घटना घडतात, मात्र डीजे लावण्यासाठी अशा प्रकारे चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.