रायगड: उरण शहरात 4 संशयित तरुण घुसल्याची माहिती मिळत आहे. या संशयितांकडे बंदुका असल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बंदुकधाऱ्यांना पाहिल्याची माहितीही देण्यात येत आहे. सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क, नागरिकांनी घाबरु नये, पोलिसांनी माहिती द्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नका, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचं आवाहन

UPDATE : सर्च ऑपरेशन संपल्याचं नौदलाकडून जाहीर, मात्र स्थानिक पोलिसांकडून तपास सुरुच

UPDATE : मुंबई पोलिसांकडून उरणमधील दुसऱ्या संशयिताचं रेखाचित्र जारी




UPDATE : मुंबई पोलिसांकडून उरणमधील संशयिताचं रेखाचित्र जारी



UPDATE : उरणसंदर्भात सर्व अहवाल उद्यापर्यंत सादर करा, गृहविभागाच्या अति. मुख्य सचिवांकडून पोलिस महासंचालकांना आदेश

UPDATE : पोलिस, नौदलासह NSG, IB, ATS कडूनही शोधमोहिम सुरु, मुंबई, नवी मुंबईत हायअलर्ट

UPDATE : उरण अपडेट : एनएसजीच्या टीमकडूनही शोधकार्य सुरु, आयबीची टीमही उरणमध्ये दाखल, शोधकार्य सुरुच राहणार

उरणमध्ये क्यूआरटी, क्राईम ब्रान्च, नौदल, पोलिस, कोस्टल पोलिस सीआयएसएफची तुकडी यांचं एकत्रित सर्च ऑपरेशन सुरु आहे.

काळे कपडे घालून आलेल्या संशयितांकडे शस्त्र असल्याची माहिती शाळकरी मुलांनी दिली. उरण हा अतिसंवेदनशील भाग असल्याने मुलांच्या माहितीवर सर्च ऑपरेशन सुरु आहे.



दक्षिण मुंबई, नवी मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी नाकाबंदी केली असून पोलिस स्टेशनला अलर्ट देण्यात आला आहे.

संवेदनशील उरण का महत्त्वाचं?



महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातला एक महत्त्वाचा तालुका म्हणजे उरण. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर उरण वसल्याने या तालुक्याला वेगळं महत्त्व आहे. आगरी आणि कोळी समाज मोठ्या प्रमाणावर असलेल्या या तालुक्यात मासेमारी आणि भात शेती प्रमुख व्यवसाय आहे.

भारतातील सर्वात मोठं बंदर म्हणजे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) उरणमध्ये आहे. शिवाय, नौदलाचं तळही उरणमधील मोराजवळ आहे. ऑईल अँड नॅचरल गॅसचं (ONGC) प्लांटही उरणमध्ये असून, GTPS-MSEB चा आशियातील पहिला नैसर्गिक गॅस प्रकल्प उरणमध्येच आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने पिरवाडी बीचही आहे, जिथे कायम पर्यटकांची वर्दळ असते. शिवाय, दिघोडे गावाजवळ रणसई धरणावरही पर्यटकांची गर्दी असते.

--------------

रायगड: उरण शहरात 4 संशयित तरुण घुसल्याची माहिती मिळत आहे. या संशयितांकडे बंदुका असल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बंदुकधाऱ्यांना पाहिल्याची माहितीही देण्यात येत आहे.

नवी मुंबई पोलिसांना त्याबाबतचे फोन आल्यानंतर इथे सकाळपासून तपास सुरु करण्यात आला आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.



पोलीस आणि नेव्हीच्या पथकांनी या परिसरात शोधमोहीम सुरु केली आहे. नेव्हीची मार्कोस टीम शाळेत हजर झाली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

इकडे मुंबई पोलिसांनाही खबरदारी घेतली आहे. मुंबई पोलिसांनी फोन नंबर जारी करुन, संशयित दिसल्यास तातडीने कळवण्याचं आवाहन केलं आहे.

दुसरीकडे कुलाबा पोलिसांनीही नागरिकांसाठी संदेश जारी केला आहे.

"सर्व सागर रक्षक / आईज ॲण्डा ईअर  सदस्य, मच्छीमार बांधव व सर्व पोलीस मित्र  यांना सूचित करण्यात येते की, चार इसम ज्यांनी भारतीय सैनिकांसारखी वेशभूषा केलेली आहे. असे इसम उरण व करंज्या परिसरात  संशयितरित्या फिरताना दिसलेले आहेत. तरी सागरी सुरक्षेच्या दृष्टिने असे  व्यक्ति  समुद्रा मागे कुलाबा परीसरात  येण्याची शक्यता आहे तसेच काही संशय वाटल्यास तात्काळ कुलाबा  पोलिस ठाणेस माहिती दया", असं आवाहन कुलाबा पोलिसांनी केलं आहे.

सर्व सुरक्षा व्यवस्था सतर्क

दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था सतर्क असल्याचं राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.