Nagpur News : नागपुरातील गुन्हेगार किती निगरगट्ट आहेत तसेच पोलिसांच्या ताब्यातही किती निर्धास्त आहेत याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. आठवड्याभरापूर्वी खुनाच्या आरोपात अटक असलेल्या आरोपीला पोलिसांनी न्यायालयात आणले. यावेळी साथीदारांनी पोलीस व्हॅनमधूनच (Police Van) त्याचा फिल्मी डायलॉगबाजी करणारा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यामुळे पोलीसांच्या ताब्यात (Nagpur Police) आरोपींचा निर्धास्तपणा उघडकीस आला आहे.


एखाद्याने गुन्हा केल्यावर त्याला पोलीस अटक करतात. तसेच समाजातील त्याची भीती घालवून देण्यासाठी आणि इतरांना त्याच्यापासून धडा मिळावा, अशी वागणूक देत असतात. मात्र पोलिसांच्या ताब्यातच गुन्हेगार आपल्या साथीदारांच्या मदतीने बाहेर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नात असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. 13 नोव्हेंबरच्या रात्री नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोशन बिहाडे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या आरोपात पकडण्यात आलेल्या आरोपींना पोलिसांनी न्यायालयात आणले. तेव्हा हत्येचा एक आरोपी अच्छी इंदुरकरला पोलीस व्हॅनमधून फिल्मी डायलॉगबाजी करताना त्याच्याच टोळीतील इतर तरुणांनी चित्रित केले.


50 लाखांची 'टीप'!


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये 'आज जेल, कल बेल और फिर वही पुराना खेल...' असे डायलॉग बोलताना या गुन्हेगाराचा व्हिडीओ त्याच्या मित्रांकडून शूट करण्यात आला. तसेच या व्हिडीओद्वारे दहशत पसरवण्याचा त्याचा प्रयत्न दिसून आला. हा गुन्हेगार एवढ्यावरच थांबला नाही. तर जेलमधून सुटून आल्यानंतर आपल्याला 50 लाख रुपयांची आणखी एक टीप म्हणजेच गुन्हेगारीचा काम मिळणार आहे, असंही तो आपल्या टोळीतील इतर मित्रांना सांगताना दिसून येत आहे.


पोलिसांकडून गुन्हेगारांची 'खास सोय'


हा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेला असतानाही त्याचे मित्र त्याला गुटखा खर्रा सर्व मिळाला ना अशी विचारणाही करत आहेत. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात असतानाही किती निर्धास्त असतात आणि पोलिसांसमोर इतर गुन्हेगार मित्रांकडून त्यांची सर्व बडदास्त ठेवली जाते का असा प्रश्न निर्माण झाला आहे.


न्यायालयाची पेशी ठरते 'मीटिंग पॉईंट'


पोलिसांकडून अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले जाते. तसेच विविध खटल्यात तुरुंगात असलेल्यांनाही न्यायालयात प्रकरणाच्या तारखेवर हजर केले जाते. यावेळी आरोपींना न्यायालयात हजर करताना सोबत ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला चिरीमिरी दिल्यास न्यायालय परिसराच्या बाहेर तसेच कोर्टरुमच्या बाहेर उभे असताना आरोपींचे साथीदार त्याच्याशी मुक्तपणे चर्चा करताना दिसतात. तसेच अनेक वेळा त्याच्याकडून खर्जा, तंबाखू, गुटखाही छुप्या पद्धतीने या आरोपींना देण्यात येत असल्याची माहिती आहे.


ही बातमी देखील वाचा


Shivsena On Governor Koshyari: माफी मागा, नाहीतर स्वत:लाच जोडे मारा; शिवसेनेचा राज्यपालांवर हल्लाबोल