सोलापूर : उत्तर सोलापुरातील रानमसले येथील शेतकरी प्रकाश दिवटे यांच्या शेतातील विहिरीत दोन दिवसांपूर्वी एक साळिंदर पडल्याची अशी माहिती वाईल्डलाइफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूरच्या सदस्यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच WCAS ची टीम रानमसलेच्या दिशेने रवाना झाली. रानमसले जाऊन पाहणी केली असता एका 50 फूट खोल पायऱ्या नसलेल्या विहिरीत साळिंदर पडले असल्याचे दिसून आले. सुरुवातीला लहान पिंजरा विहिरीमध्ये सोडून त्याला काठावरूनच पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो अयशस्वी ठरला.
शेवटी प्रसंगवधान राखून WCAS चे सदस्य सुरेश क्षीरसागर यांना हारनेसच्या सहाय्याने रॅपलिंग करून खाली विहिरीत उतरावे लागले. परंतु खाली उतरून सुद्धा साळिंदर पूर्ण विहिरीत कधी पाण्यात तर कधी पाण्याबाहेर असा लपंडाव खेळत असल्यामुळे आमची दमछाक झाली होती. त्यामुळे त्याला पकडणे फार अवघड जात होते. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला की, आपल्या शेपटीकडील काट्यांची ढाल सामोरे करून तो संरक्षक पवित्रा घेत होता. शेवटचा प्रयत्न व मास्टरस्ट्रोक म्हणून सुरेश यांना पाण्यात उतरायला सांगण्यात आले.
सुरेश यांनी पाण्यात उतरून सुद्धा साळिंदर पिंजऱ्यात यायला तयार नव्हते. शेवटी त्याला एक कोपऱ्यात व्यवस्थित ट्रॅप करून पिंजऱ्यात घालण्यात सुरेश यांना यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्याला सुरक्षितरीत्या पकडल्यानंतर सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात सुरेश यांचे आभार मानले. या घटनेबाबत आधीच माळढोक पक्षी अभयारण्य, नान्नज विभागाला कळविण्यात आले होते. त्यांच्या नोंदीनंतर त्या साळिंदरला लगेच जवळच त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडून देण्यात आले.
या बचावकार्यात WCAS चे अजित चौहान, सुरेश क्षीरसागर, काशिनाथ धनशेट्टी आणि रत्नाकर हिरेमठ यांनी सहभाग घेतला. तर माळढोक पक्षी अभयारण्य नान्नजकडून वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी जावळे, ललिता बडे,अशोक फडतरे आणि वनमजुर सुधीर गवळी यांनी सहकार्य केले.
साळींदर हा निशाचर प्राणी असून, ऊस शेतीच्या ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणात रहिवास असतो. साळींदर हा काटे अंगावर फेकतो, अशा अनेक प्रकारच्या गैरसमजुती असल्यामुळे याच्या शिकारीच्या घटना सर्रास घडतात. हा प्राणी वनखात्याचा सूची चारमध्ये येत असून साळींदर मारण्यास अथवा मृत प्राण्याचे मांस बाळगणे, विक्री करणे हा गुन्हा आहे.