मुंबई : कोरोनाचा प्रकोप देशात सर्वाधिक महाराष्ट्रात आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळं राज्य सरकारनं केंद्राकडे रेमडेसिवीरचा साठा वाढवून देण्याची मागणी केली होती. राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून 4 लाख 35 हजार करण्यात आला आहे.


Corona Update | राज्यात आज 67,167 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, तर 63,118 रुग्णांची कोरोनावर मात


आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की , 21 एप्रिल ते 31एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे 16 लाख रेमडेसिवीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत माहिती दिली असून त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,  केंद्र सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचे सर्वाधिक वितरण केलं आहे. नव्याने वितरण जाहीर झालेल्या 5 लाखांपैकी महाराष्ट्राला 1,65,800 अर्थात 34 टक्के रेमडेसिवीर दिलं आहे. आतापर्यंतच्या एकूण 16 लाख रेमडेसिवीरपैकी 4,35,000 आणि तेही केवळ 10 दिवसांसाठी!, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 






राज्यात आज 67,167 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज  67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 63 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के  झाले आहे. राज्यात आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.