हिंगोली : कॉलेजची फी भरण्याच्या चिंतेतून विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार वसमत तालुक्यातील आसेगाव येथे घडला आहे. भीमाशंकर भालेराव असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. प्रवेश नाकारलेल्या शिक्षकांना भीमाशंकरने आत्महत्येचा इशाराही दिला होता.
भीमाशंकर वसमत तालुक्यातील श्री चतुर्मुखी विनायक शिक्षण प्रसारक मंडळ आसेगाव संचालित चतूरमुखी विनायक माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथील बारावी (कला) शाखेचा विद्यार्थी आहे. काही कारणास्तव गेल्या वर्षी तो बारावीची परीक्षा देऊ शकला नव्हता. यावर्षी पुन्हा अॅडमिशन घेण्यासाठी तो कॉलेजला गेला असता त्याला प्रवेश नाकारण्यात आला.
भीमशंकरने प्रवेश न मिळण्याबाबत विचारणा केली असता, कॉलेजमध्ये आधीच प्राध्यापक कमी आहेत. तसेच प्रवेश घ्यायचा असेल तर अधिक पैसे भरावे लागतील, असं त्याला सांगण्यात आलं. मात्र घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे भीमाशंकरला अतिरिक्त पैसे भरणे शक्य नव्हते.
कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे कुठून आणणार आणि प्रवेश नाही मिळाला तर वर्ष वाया जाणार या चिंतेत भीमाशंकरने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ तयार केला आणि त्यानंतर थेट जवळील विहिरीत उडी घेतली.
सुदैवाने भीमाशंकरला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. भीमाशंकरवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वसमत पोलीस पुढील तपास करत आहेत.