बुलडाणा : बुलडाण्यात एका तरुण शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून, त्यानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केली. सिंदखेडराजा तालुक्यातील सावरखेड तेजन गावात ही धक्कादायक घटना घडली. गजानन जायभाये (वय 35 वर्ष) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.


गजानन जायभाये यांची तीन एकर शेती आहे. मात्र कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर महाराष्ट्र बॅंकेचे 70 हजार रुपयांचं कर्ज होतं. त्यात कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्यांना आणखी कर्ज मिळू शकलं नाही. कर्ज माफ होऊन पुन्हा बँकेकडून कर्ज मिळेल या आशेवर यंदा शेतीच्या मशागत आणि पेरणीसाठी गजानन यांनी बाहेरुन कर्ज घेतलं.

कर्जासाठी त्यांनी महाराष्ट्र बॅंकेच्या खूप चकरा मारल्या, पण कर्ज मिळालं नाही. आपल्याकडचे दागिने पतसंस्थेत गहाण ठेवले होते. मात्र बँकेकडून कर्ज मिळण्याबाबत संभ्रमाला  कंटाळून गजानन जायभाये यांनी काल रात्री उशिरा (29 जुलै) आपल्या शेतात सरण रचलं. त्यानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केली. पोलिसांनीही आत्महत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.