सांगली : सांगली -पेठदरम्यानच्या आणि महापालिका क्षेत्रातील खराब रस्त्याचा विषय आता चांगलाच तापला आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर न झाल्यास या रस्त्यांना राजकीय नेत्यांचं नाव देण्याचा इशारा सांगली रस्ता बचाव कृती समितीने दिला आहे.

विशेष म्हणजे, सांगली-पेठ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रस्त्याचे नामकरण  'पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेस वे असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सांगली रस्ता बचाव कृती समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेने 1 जानेवारीपर्यंत सांगली-पेठ रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अल्टीमेटम देण्यात आला आहे. 1 जानेवारीपर्यंत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर या रस्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्स्प्रेस-वे नाव देण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला.

या शिवाय सांगली-कोल्हापूर रस्त्यालाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, महापौर यांची नावे रस्त्याला देण्यावर बैठकीत एकमत झाले. यामुळे हे रस्ते योग्य रितीने आणि लवकर दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मनपावर दबाव वाढला आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून सांगली - पेठ रस्त्याच्या दुरवस्थेवरुन सोशल मीडियात खिल्ली उडवली जात आहे. महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यांवरुन नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी रस्त्यांच्या विषयावर खास बैठक घेवून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. शिवाय, डिसेंबर अखेर जिल्हा खडेमुक्त करण्याच्या सक्त सुचना दिल्या.