वर्धा : वर्ध्यात लवकरच शेतकऱ्यांसाठी 'रुरल मॉल' सुरू होणार आहे. या मॉलमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल आणि शेतीसाठी पूरक साहित्य मिळणार आहे. शेतकरी उत्पादन कंपनीकडे या मॉलचं व्यवस्थापन असेल.


शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी एक हक्काची बाजार पेठ या मॉलच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यामध्ये शेतकरी, बचत गट ते थेट ग्राहक असा व्यवहार होईल. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा संकल्पनेतून हा रुरल मॉल तयार होत आहे. यामध्ये शेतमाल प्रक्रिया किंवा पॅकिंग करुन विकला जाणार आहे. यामुळे शेतमालाला व्हॅल्यू अडीशनच्या माध्यमातून अधिक नफा मिळणार आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेलगतच्या पुरवठा विभागाचं बंद असलेल्या गोदामात हा मॉल उभारला जात आहे. ऑगस्ट महिन्यात हा मॉल सेवेत येणार असल्याचं बोललं जात आहे. वर्षातून एखाद्या वेळेस धान्य महोत्सव किंवा एखाद्या उपक्रमातून मिळणारी बाजार पेठ आता वर्षभर उपलब्ध होणार आहे, कर्ज आणि हमीभाव न मिळाल्यामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचविण्यासाठी या मॉलची नक्कीच मदत होईल.